म्यानमारकडून भारताच्या सीमेजवळ हवाई आक्रमण !

नवी देहली – भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांनी उभारलेल्या तळांवर म्यानमारने हवाई आक्रमण केले. या आक्रमणानंतर मिझोराममध्ये अतीदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. या हवाई आक्रमणामध्ये किती बंडखोर मारले गेले ?, याची माहिती उपलब्ध झालेली नाही. सध्या म्यानमारमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे.

बंडखोर गटांकडून सैन्याला आव्हान !

म्यानमारमधील सैनिकी राजवटीला बंडखोर गटांच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. भारत-म्यानमार सीमेजवळील उत्तरेकडील शान राज्यात याआधी भीषण चकमक झाली होती. वर्ष २०२१ मध्ये झालेल्या सत्तापालटानंतर देशात सैनिकी राजवट चालू झाली. म्यानमारच्या लष्कर-नियुक्त राष्ट्रपतींनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन ‘बंडखोरी’ अधिक प्रभावीपणे हाताळण्यात अपयशी ठरल्याने देशाचे विघटन होण्याचा धोका आहे’, अशी स्वीकृती दिली.

सीमाभागावर बंडखोरांचं नियंत्रण !

सरकारविरोधी बंडखोर गटांनी १०० हून अधिक सैनिकी चौक्यांवर नियंत्रण मिळवले आहे. सीमापार व्यापाराला अनुमती देणार्‍या आणि ४० टक्के महसूलाचा स्रोत असलेल्या मुख्य सीमा क्रॉसिंगवर सरकार नियंत्रण गमावत चालले आहे. चीनने दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. चीनने म्यानमारच्या दुर्गम भागांत ऊर्जेसाठीच्या पायाभूत सुविधांसाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

९० सहस्र लोक विस्थापित !

सैनिक आणि बंडखोर गट यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे अमुमाने ९० सहस्र लोक विस्थापित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी माहिती दिली की, गोळीबार आणि हवाई आक्रमणे चालू असलेल्या शान राज्यात अनुमाने ५० सहस्र लोक विस्थापित झाले आहेत. काहींनी चीनमध्ये आश्रय घेतला आहे. शेजारच्या सागिंग आणि काचिन या प्रदेशांत ४० सहस्रांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.