जागतिक हिंदु काँग्रेस (वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस) मनांना एकत्र आणून उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवते !

२४ ते २६ नोव्‍हेंबर २०२३ या कालावधीत बँकॉक, थायलंड येथे ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’चे आयोजन करण्‍यात आले आहे. त्‍या निमित्ताने…

जागतिक हिंदु काँग्रेस (वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस) प्रत्‍येक ४ वर्षांनी आयोजित केली जाते. यंदा तिचे आयोजन २४ ते २६ नोव्‍हेंबर २०२३ या कालावधीत बँकॉक येथे आयोजित करण्‍यात आले आहे. जागतिक हिंदु काँग्रेस हे एक महत्त्वाचे व्‍यासपीठ आहे, जे सीमांच्‍या पलीकडे जाण्‍याचा प्रयत्न करते आणि विविध हिंदु समुदायाला एकत्रितपणे आव्‍हानांना सामोरे जाण्‍यासाठी, यश साजरे करण्‍यासाठी, तसेच समृद्धी, न्‍याय अन् शांतता निर्माण करण्‍यासाठी अथवा समविचार प्रस्‍थापित करण्‍यासाठी म्‍हणून उदयास आले आहे. बँकॉक, थायलंड येथेे होणारी जागतिक हिंदु काँग्रेसही हिंदु समुदायाशी जागतिक स्‍तरावर चर्चा करण्‍यासाठी, रणनीती आखण्‍यासाठी आणि जगभरातील हिंदूंची प्रतिमा / भूमिका बळकट करण्‍यासाठी, त्‍यांंची मने एकत्रित करून या व्‍यासपिठाचा विस्‍तार करण्‍याचे आश्‍वासन देते.

१. जागतिक व्‍यासपीठ आणि एकता

अनुमाने १२० कोटी असलेल्‍या हिंदूंपैकी जागतिक स्‍तरावरील लक्षणीय १६ टक्‍के हिंदू २०० देशांत पसरलेले आहेत. त्‍यांचा प्रभाव व्‍यवसाय आणि तंत्रज्ञान यांपासून ते शासन अन् संस्‍कृती इथपर्यंत विस्‍तृत क्षेत्रांमध्‍ये व्‍यापून आहे. अशा विखुरलेल्‍या परिस्‍थितीतही ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ त्‍यांना एकत्रित आणण्‍यासाठी एक शक्‍ती म्‍हणून कार्य करते. तेथील नेते, विचारवंत, कार्यकर्ते यांना विचारांची देवाण-घेवाण करण्‍यास आणि अधिक चांगला सहयोग देण्‍यासाठी प्रोत्‍साहित करते.

२. सांस्‍कृतिक, आध्‍यात्‍मिक आणि भौतिक प्रगतीला चालना देणे

स्‍वामी विज्ञानानंदजी

‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ ही केवळ परिषद नसून त्‍याच्‍याही पलीकडे जाऊन ती एक ‘उत्‍प्रेरक’ म्‍हणून कार्य करते. हिंदु मूल्‍ये, सर्जनशीलता आणि कौशल्‍य यांविषयी चर्चा करण्‍यासाठी व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देते, तसेच सांस्‍कृतिक, आध्‍यात्‍मिक आणि भौतिक परिमाणांसहित सर्वांगीण प्रगतीला चालना देते. हा एकात्‍मिक दृष्‍टीकोन हिंदूंना त्‍यांच्‍या भूतकाळापासून शिकणे, सध्‍याच्‍या आव्‍हानांचे विश्‍लेषण करणे आणि संपूर्ण मानवतेच्‍या लाभदायक समृद्धीसाठी एक नकाशा (रोडमॅप) सिद्ध करणे, यांसाठी उद्युक्‍त करतो.

३. गंभीर समस्‍यांना वाचा फोडणे

मानवाधिकारांचे उल्‍लंघन, भेदभाव आणि सांस्‍कृतिक आघात यांसारख्‍या जगभरातील हिंदूंवर प्रभाव टाकणार्‍या गंभीर समस्‍यांचा ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ सामना करते. अशा परिषदेमधून सर्वांशी खुलेपणाने गंभीर समस्‍यांविषयीची चर्चा आणि रणनीती यांविषयीचा सहयोग, तसेच त्‍यांतून ही ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ जागृती निर्माण करणे, संवाद साधणे अन् अशा समस्‍या वा अडथळ्‍यांंच्‍या विरुद्ध प्रतिकार निर्माण करू पहाते.

४. विविध विषयांवर (थिमॅटिक) समांतर परिषदा

यंदाच्‍या वर्षी विविध विषयांवर ७ (थिमॅटिक) समांतर परिषदांचे आयोजन केले आहे. यांमध्‍ये हिंदूंंची प्रतिबद्धता आणि सशक्‍तीकरण यांच्‍या विशिष्‍ट पैलूंवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्‍यामुळे सहभागींना समाजासमोरील विविध संधी आणि आव्‍हाने शोधण्‍यासाठी अन् ती जाणून घेण्‍यासाठी एक व्‍यापक, तसेच वैविध्‍यपूर्ण सर्वंकष व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्‍यात येते.

५. आर्थिक सशक्‍तीकरण

‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’च्‍या अंतर्गत स्‍थित ‘जागतिक हिंदू मंचाचे ध्‍येय त्‍यांना स्‍वत:ला आर्थिकदृष्‍ट्या सक्षम करणे नसून समस्‍त हिंदु समाजाला आर्थिकदृष्‍ट्या सक्षम आणि त्‍यांची आर्थिक वाढ करून त्‍यांचे हित साधणे’, हे आहे. उत्तेजनात्‍मक सत्रे, नेटवर्कींग संधी आणि उद्योगसंबंधित चर्चा यांद्वारे हा मंच प्रतिनिधींना नाविन्‍यपूर्ण कल्‍पना अन् भागीदारी देऊन आर्थिक उन्‍नतीसाठी योगदान देतो, ज्‍याचा केवळ स्‍वत:लाच नव्‍हे, तर संपूर्ण हिंदु समाजाला लाभ होतो.

‘आसियान’ (असोसिएशन ऑफ साऊथ इस्‍ट एशियन नेशन्‍स), म्‍हणजेच दक्षिण पूर्व आशियाकडील देश आणि भारत यांच्‍यातील आर्थिक संबंध वाढवल्‍यानेे विकासाच्‍या संधी उपलब्‍ध होऊ शकतात अन् हिंदु समाजाच्‍या आर्थिक समृद्धीला चालना किंवा गती मिळू शकते. आधुनिक शेतीविषयक चर्चा केल्‍याने अन्‍न सुरक्षा आणि उपजीविका यांमध्‍ये वाढ होऊ शकते. आरोग्‍य सेवेतील नव्‍या कल्‍पना वा शोध यांच्‍यामुळे हिंदूंचे जीवन आरोग्‍यदायी होऊ शकते, तसेच त्‍यामुळे वैद्यकीय पर्यटनालाही प्रोत्‍साहन मिळू शकते. तांत्रिक उद्योगाचे जागतिक महत्त्व जाणून त्‍याला प्रोत्‍साहन दिल्‍याने हिंदूंमध्‍ये आर्थिक वाढ आणि नवनिर्मिती करण्‍याची जिद्द निर्माण होऊ शकते. निधी संकलनाच्‍या पर्यायांविषयी विचार करण्‍याने सामुदायिक प्रकल्‍प आणि उपक्रम यांना निधी मिळू शकतो.

६. शैक्षणिक दर्जा उंचावणे

सर्वांच्‍या शिक्षणाचा दर्जा उंचावण्‍यासाठी शिक्षक, प्रशासक आणि भागधारक यांना एकत्र आणण्‍याचा ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’चा प्रयत्न असतो. मूल्‍याधारित शिक्षणासाठी ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ ही सर्जनशील पद्धतींवर लक्ष केंद्रित करते, बौद्धिक नेतृत्‍वाला प्रोत्‍साहन देते आणि शैक्षणिक क्षेत्रात हिंदु सभ्‍यतेचे अचूक प्रतिनिधीत्‍व प्रस्‍थापित करते.

नावारूपास येत असणार्‍या अर्थव्‍यवस्‍थांमध्‍ये हिंदूंच्‍या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी दर्जेदार शिक्षणाची किती आवश्‍यकता आहे ? हे जाणून ते सुनिश्‍चित करण्‍याचा प्रयत्न करते. पूर्वग्रह जोपासून आणि पूर्वीचीच शिक्षणपद्धत चालू ठेवणे यांचे खंडण करण्‍यासाठी ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ परिभाषाशास्‍त्र अन् वृत्तांत यांचे परीक्षण करून त्‍यांच्‍याविषयी चर्चा घडवून आणते. शिक्षणात कलेच्‍या उपयुक्‍ततेविषयी चर्चा करून त्‍यामुळे सांस्‍कृतिक जतन आणि समज वाढवण्‍याचा प्रयत्न करते. हिंदू समाजाच्‍या बौद्धिक वाढीसाठी पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि प्रसार करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. हिंदु धर्माविषयीचे अचूक दर्शन घडवणे, शिक्षण आणि हिंदु संस्‍कृती यांची समज येण्‍यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

७. माध्‍यमांचे प्रतिनिधीत्‍व

‘हिंदू मिडिया कॉन्‍फरन्‍स’ने वृत्तांताला आकार देणार्‍या माध्‍यमांची महती ओळखली आहे. ही परिषद पत्रकारिता, वृत्तमाध्‍यमे आणि मनोरंजनात हिंदु समाजाच्‍या अचूक अन् सकारात्‍मक चित्रणाच्‍या किंवा वृत्तांकनाच्‍या महत्त्वावर भर देते. मुख्‍य प्रवाहातील माध्‍यमांमध्‍ये हिंदू आवाजांसाठी सुरक्षित जागा निर्माण करणे, वृत्तमाध्‍यमांमधील खोट्या वृत्तांकनाशी लढा देणे, डिजिटल वृत्तमाध्‍यमे आणि मुक्‍त भाषणे यांसाठी लढणे, पक्षपाताशी लढतांना सभ्‍यतावादी चेतना जागृत करणे, सिनेमाचा हक्‍क पुन्‍हा प्रस्‍थापित करून नव्‍याने शोध घेणे, मनोरंजनाच्‍या माध्‍यमातील ‘हिंदुफोबिया’शी (हिंदुद्वेषाशी) लढा देणे, ‘बॉक्‍स ऑफिस’च्‍या (बॉलीवूडच्‍या) पलीकडे पहाणे, पत्रकारिता अन् जनसंपर्क माध्‍यम संस्‍थांमध्‍ये हिंदूविरोधी अन् डाव्‍या बाजूचा पक्षपात यांविषयी ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ जागृती करते.

८. राजकीय सहभाग

‘हिंदू राजकीय परिषद’ ही ‘सर्वांसाठी उत्तरदायी लोकशाही’, या तत्त्वावर आधारित हिंदूंमध्‍ये सक्रीय सहभागाला प्रोत्‍साहन देते. कायदेतज्ञ, मुत्‍सद्दी आणि धोरण तज्ञ जागतिक स्‍तरावर हिंदूंवर परिणाम करणार्‍या समस्‍यांचे विश्‍लेषण करण्‍यासाठी, उत्तरदायी लोकशाहीचा प्रचार करण्‍यासाठी आणि समाजाचे हक्‍क, तसेच हितसंबंध जपण्‍यासाठी या परिषदेत एकत्र जमतात.

९. महिला आणि युवक यांचे सक्षमीकरण वा सशक्‍तीकरण

हिंदु महिला आणि युवक परिषदेने हिंदु पुनरुत्‍थानात महिला अन् तरुण व्‍यक्‍ती यांच्‍या परिवर्तनशील भूमिका जाणल्‍या आहेत. हिंदु महिला आणि युवक परिषद या नेतृत्‍वाला प्रेरित करतात, संवादासाठी व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देतात अन् धार्मिक मूल्‍यांचा आदर करणारा सशक्‍त हिंदु समाज निर्माण करण्‍यासाठी महिला आणि तरुण यांच्‍या सक्रीय सहभागाला प्रोत्‍साहित करतात.

१०. हिंदु संघटनांचे बळकटीकरण

‘हिंदु संघटना परिषद’ ही विविध हिंदु संघटना, मंदिरे आणि मंडळे या सर्वांना एकत्र आणण्‍यावर भर देते. ही परिषद समस्‍त हिंदु समाजाचे हित अधिक प्रभावीपणे साधण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍याच्‍या पुनरुत्‍थानासाठी संवाद, समन्‍वय आणि सहयोग वाढवून एक चळवळ निर्माण करते.

हिंदूंची मंदिरे त्‍यांच्‍या भूमी सरकारच्‍या, तसेच चर्चच्‍या तावडीतून वा अतिक्रमणातून सोडवू पहातात. मंदिरांच्‍या भूमी, म्‍हणजे हिंदू नवजागरणाची उत्तम संधी असते. हिंदु मूल्‍ये आणि संस्‍कार यांना योग्‍य दर्जा देणे, हिंदु तरुणींचे लव्‍ह जिहादपासून रक्षण करणे, जगभरातील हिंदूंच्‍या मानवी हक्‍कांच्‍या उल्‍लंघनाला आळा घालणे, हिंदूंच्‍या देवतांच्‍या ज्‍या मूर्ती गायब झाल्‍या आहेत त्‍यांचा शोध घेऊन त्‍या परत आणणे, भाषा आधारित हिंदु संंघटनांनी एकत्र येऊन कार्य करणे, यांसाठी ही परिषद कार्य करते.

११. ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’चा सामयिक दृष्‍टीकोन आणि उद्देश निर्माण करण्‍यासाठी

‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ ही जगभरातील हिंंदूंमध्‍ये सामयिक दृष्‍टी आणि उद्देश निर्माण करणे; व्‍यक्‍ती, संस्‍था आणि नेते यांना समान छत्राखाली आणून ही काँग्रेस अर्थपूर्ण संवाद, नाविन्‍यपूर्ण कल्‍पना अन् उज्‍ज्‍वल भविष्‍य साकारण्‍यासाठी धोरणात्‍मक सहकार्य, तसेच चालना देऊ इच्‍छिते.

सारांश रूपात सांगायचे झाल्‍यास बँकॉक येथे भरणारी ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस २०२३’ विविध आव्‍हानांना जिंकत प्रवास चालू ठेवते’, असे म्‍हणता येईल. ती जगभरातील हिंदूंची चिकाटी, एकता आणि आकांक्षा यांना मूर्त रूप देते. आव्‍हानांना संबोधित करून यश वा संधी देण्‍याचा प्रयत्न करते, तसेच उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी धोरण आखून सामायिक दृष्‍टी अन् उद्देश यांतून आलेली शक्‍ती प्रदर्शित करते. जगाच्‍या विविध ठिकाणचे हिंदू बँकॉकमध्‍ये एकत्र येत असतांना हिंदु धर्माच्‍या मूलभूत मूल्‍यांमध्‍ये रुजलेल्‍या समृद्ध, न्‍याय्‍य आणि शांततेच्‍या जगाप्रती ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ वचनबद्धतेची पुष्‍टी करते.

– स्‍वामी विज्ञानानंदजी, प्रवर्तक, ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ (४.११.२०२३)