सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसनूव देहलीसह देशभरात मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत फटाके !

नवी देहली – देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव केला जात असतांना फटाकेही तितक्याच प्रमाणात फोडले जात आहे. देशाची राजधानी देहलीसह अनेक शहरांमध्ये वायूप्रदूषणाने धोक्याची पातळी अनेक पटींनी ओलांडलेली असतांना देशवासियांकडून त्याकडे दुर्लक्ष करत फटाके फोडले जात आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असतांनाही देहलीसह अनेक शहरात ते धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे.


विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देहली-एन्.सी.आर्. भागामध्ये फटाके फोडण्यावर बंदीच घातली आहे. तरीही येथे या आदेशाचे उल्लंघन करत फटाके फोडले जात आहेत. या संदर्भात पर्यावरणवादी भवरीन कंधारी यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात होते. पोलिसांत तक्रार करूनही काहीही उपयोग झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही. आदेशानुसार कार्यवाही करण्यात अधिकारी अपयशी ठरले आहेत. आता सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार ?, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. उत्सवाच्या नावाखाली आपण आपल्या मुलांना प्रदूषित जीवन जगण्यास भाग पाडत आहोत, अशी टीका कंधारी यांनी केली.

संपादकीय भूमिका

  • फटाके फोडू नयेत, असा आदेश देतांना त्यांची निर्मिती, विक्री आणि साठा करण्यात येऊ नये, असा आदेशही आता देणे क्रमप्राप्त झाले आहे !
  • केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे नाही, तर वर्षभर विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते, त्यावरही तितक्याच कठोरपणे उपाय काढून त्याची कार्यवाही होणेही आवश्यक आहे !