Diwali Deepawali diwali 2023 deepawali 2023
श्रावणातील व्रतवैकल्ये, भाद्रपदातील गणेशोत्सव आणि आश्विनातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्द उच्चारताच आपल्या मनात आनंदाचे कारंजे उडू लागतात. दीपावलीचा सण म्हणजे वेगवेगळ्या उत्सवांचे जणू स्नेहसंमेलनच. दीपावली हा प्रकाशाचा उत्सव !
भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा हा सण ! दिवा किंवा ज्योत हे प्रकाशाचे प्रतीक आहे. प्रकाश काळोखावर, अंधःकारावर मात करतो. हा अंधःकार म्हणजे नुसता अंधार नव्हे, तर अज्ञान, अंधश्रद्धा हीसुद्धा अंधःकाराचीच रूपे आहेत. या अज्ञानांःधकारावर मात करण्यासाठी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करावा, हाच उद्देश दिवाळी या सणामागे आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानदेव म्हणतात –
मी अविवेकाची काजळी ।
फेडूनि विवेकदीप उजळीं ॥
तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ५४
अर्थ : मी विवेकदीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळी होते.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘मी समाजातील अविवेकाचा, अविचारांचा, दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून, अविवेकाची काजळी झटकून, अज्ञानाचा अंधःकार नष्ट करतो आणि विवेकाचा नंदादीप प्रज्वलित करून ज्ञानाच्या प्रकाशमार्गाने मोक्षाची दिशा दाखवतो.’’ भगवंताने दाखवलेल्या अशा ज्ञानमार्गावर वाटचाल करून विवेकाची कास धरणे, म्हणजेच खर्या अर्थाने ज्ञानाची दिवाळी साजरी करणे होय.
– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली
(साभार : ‘आदिमाता दीपावली विशेषांक’)