रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात कु. अपाला औंधकर (वय १८ वर्षे) आणि कु. प्रार्थना पाठक (वय १३ वर्षे) घेत असलेल्या दैवी सत्संगामुळे कृतीच्या स्तरावर प्रयत्न होणे 

कु. अपाला औंधकर आणि कु. प्रार्थना पाठक

१. ‘अन्नाच्या प्रत्येक घासात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्नपूर्णामाता यांची पुष्कळ कृपा आहे’, असा भाव अनुभवता येणे 

‘एकदा दैवी सत्संगात नवरात्रीनिमित्त अन्नपूर्णादेवीच्या संदर्भात विषय झाला. त्यामध्ये ‘कारुण्यमयी अन्नपूर्णामातेच्या कृपेमुळे आपल्याला या आपत्काळातही अन्न मिळत आहे. ‘भूमाता, जलदेवता आणि वायुदेवता यांच्यामुळे आपल्याला अन्नाची सामुग्री मिळते आणि अन्नाच्या प्रत्येक घासात प.पू. गुरुदेवांची कृपा आहे’, अशी विविध सूत्रे सांगून कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी मार्गदर्शन केले. दैवी सत्संगात ज्या वेळी हा विषय चालू होता, त्या वेळी माझ्या मनात अन्नपूर्णादेवीप्रती कृतज्ञताभाव जागृत होऊन मला देवीची सर्वांवर असलेली अपार प्रीती अनुभवता आली. दैवी सत्संगात ध्येय दिले होते, ‘अन्नाच्या प्रत्येक घासाप्रती कृतज्ञ रहायचे आहे.’ दैवी सत्संगात दिलेल्या ध्येयाप्रमाणे मला प्रयत्न करता आले. प्रत्येक घासाच्या वेळी प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि अन्नपूर्णामाता यांनी पुष्कळ कृपा केली आणि महाप्रसाद घेतांना मला ती कृपा अनुभवता आली.

२. सत्संगात दिलेल्या ध्येयानुसार प्रयत्न केल्यावर न आवडणारा पदार्थही आनंदाने खाता येणे 

कु. शर्वरी कानस्कर

त्यानंतर २ दिवसांनी मला न आवडणारा एक पदार्थ महाप्रसादात होता. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मला हा पदार्थ आवडत नाही, मला नको’, आणि दुसर्‍या क्षणी अंतर्मनाने बाह्यमनाला सूचना दिली, ‘शर्वरी, दैवी सत्संगात दिलेले ध्येय केवळ एका दिवसासाठी दिलेले नसते. तू दैवी सत्संगात सांगितलेले प्रयत्न नेहमी कृतीत आणायला हवेत. मगच खर्‍या अर्थाने ते ध्येय पूर्ण हाेईल. पदार्थ त्याच्या गुणधर्माचे पालन करत आहे. ‘तुला तो पदार्थ आवडत नाही’, हा तुझा स्वभावदोष आहे. हा पदार्थ अन्नपूर्णामातेने पुष्कळ प्रीतीने सिद्ध केला आहे आणि प्रत्येकावर करुणा करून तीच सूक्ष्मातून हा महाप्रसाद सर्वांना भरवत आहे. तू ठरवायचे आहे, तुला हा पदार्थ आवडत नाही; म्हणून घेणार नाही कि हा महाप्रसाद म्हणजे गुरु आणि अन्नपूर्णामाता यांची कृपा आहे आणि ती मला अनुभवायची आहे.’ मला माझी चुकीची विचारप्रक्रिया लक्षात आली आणि जो पदार्थ पूर्वी मला आवडायचा नाही, तो मला आनंदाने खाता आला.

३. कृतज्ञता 

हे गुरुदेवा, ही केवळ आपलीच कृपा आहे. या सत्संगाच्या माध्यमातून स्वतःच्या अयोग्य विचारांना आनंदाने पालटण्याची प्रक्रिया करता येते. हे देवा, हे केवळ आपल्यामुळेच सर्व शक्य आहे. तुम्ही प्रत्येक प्रसंगातून शिकवून सर्वांवर प्रीती करता. ‘योग्य काय आहे ?’, हे दैवी सत्संगाच्या माध्यमातून शिकवल्याबद्दल आपल्या कोमल चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.