ठाणे, १० नोव्हेंबर (वार्ता.) – सातवाहन कुळाच्या राजाचे वंशज असल्याचे सांगत ‘दुर्गाडी गड आणि बंदर पट्टीचा भाग त्याच्या माळशेज नाणेघाट वनक्षेत्र पर्यटन विकास समितीच्या नावावर करण्यात यावा’, अशी मागणी बनावट कागदपत्रांच्या आधारे करणार्या सुयश शिर्के-सातवाहन या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सुयशच्या मागणीमुळे इतिहासाच्या अभ्यासकांनीही आश्चर्य व्यक्त केले होते.
सौजन्य जय महाराष्ट्र न्यूज
मागील ८ वर्षांच्या काळात दुर्गाडी गड भूमीची बनावट कागदपत्रे सिद्ध करून या कागदपत्रांवर कल्याण तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘कागदपत्रे खरी आहेत’, असे दाखवून सुयशने कल्याण तहसीलदार कार्यालयात वरील मागणी केली. असाच पत्रव्यवहार त्याने दुर्गाडी क्षेत्र नियंत्रणाखाली असलेल्या बाजारपेठ पोलिसांकडेही केला होता. महसूल विभागाला सुयशच्या कागदपत्रांविषयी संशय आला. त्याच्या चौकशीत ही कागदपत्रे संशयास्पद बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशावरून तहसीलदार जयराज देशमुख यांनी कल्याणच्या मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांना सुयश शिर्के याच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला. मागील आठवड्यात सुयशविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.