37th National Games : गोव्याने ९२ पदके मिळवून इतिहास रचला !

३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

पणजी, ९ नोव्हेंबर (वार्ता.) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याने २७ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३८ कांस्य पदके मिळून एकूण ९२ पदके मिळवली आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत यजमान गोव्याने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यामुळे स्पर्धेतील राज्यांच्या सूचीमध्ये गोवा ९ व्या स्थानावर पोचला आहे.

स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण २२७ पदके (८० सुवर्ण, ६८ रौप्य आणि ७९ कांस्य पदके) प्राप्त करून सूचीमध्ये पहिले स्थान मिळवले आहे, तर ‘सर्व्हिसीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड’ यांनी एकूण १२६ (६६ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३३ कांस्य पदके) पदके मिळवून दुसरे स्थान, तर हरियाणा राज्याने एकूण  १८६ (५९ सुवर्ण, ५४ रौप्य आणि ७३ कांस्य पदके) पदके मिळवून तिसरे स्थान पटकावले आहे.

गोवा बॉक्सिंग (मुष्टीयुद्ध) संघटनेने  नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोवा बॉक्सिंग संघटनेने राष्ट्रीय खेळाचा परराज्यांतील खेळाडूंचा सहभाग करण्यासंबंधी नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप गोव्यातील मुष्टीयुद्ध प्रशिक्षक सॅमसन जॉय यांनी गोवा ऑलिंपिक संघटनेला एक पत्र लिहून केला आहे.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

पत्रात लिहिल्यानुसार ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या मुष्टीयुद्ध चमूमध्ये एकूण ७ पैकी ५ बॉक्सर हे परराज्यांतील होते. नियमानुसार एकूण संख्येच्या केवळ ३० टक्केच खेळाडू परराज्यांतून घेता येतात. माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती गोळा केल्याचा प्रशिक्षक सॅमसन जॉय यांचा दावा आहे. यामुळे गोव्यातील प्रतिभावान खेळाडू वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोवा ऑलिंपिक संघटना या प्रकरणी अन्वेषण करत आहे.


क्लिक करा : National Games 2023 medal tally

राष्ट्रीय खेल 2023 पदक तालिका