कोल्हापूर – केंद्र सरकारच्या विशेष समितीकडून ‘पी.एम्. इ-बससेवा’ प्रकल्प चालू असून त्याअंतर्गत कोल्हापूर शहराला १०० वातानुकूलित इ-बसगाड्या संमत करण्यात आल्या आहेत. ही कोल्हापूरला दिवाळी भेट आहे, अशी माहिती राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूर महापालिकेला ‘इ-बसगाड्या’ मिळाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू होता. संपूर्ण देशात ३ सहस्र १६२, तर महाराष्ट्रासाठी १ सहस्र २९० ‘इ-बसगाड्या’ संमत झाल्या आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार, राज्यातील निवडक शहरांमध्ये ‘इ-बसगाड्यां’ची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शहराची आवश्यकता लक्षात घेऊन कोल्हापूरसाठी १०० ‘इ-बसगाड्या’ संमत करण्यात आल्या आहेत. त्याचा आदेशही केंद्रीय मंत्रालयाने काढला आहे. जानेवारीपर्यंत या बसगाड्या कोल्हापूर परिवहनच्या कह्यात येतील. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार असून प्रदूषणही अल्प होण्यास साहाय्य होणार आहे.’’