इलिनॉय (अमेरिका) – व्यक्तीने रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कार्यालयात काम करत असतांना आपण जेवढे शांत राहू, तेवढे कार्यालयाचे वातावरणही प्रसन्न रहाते, असे म्हटले जाते. यालाच आजच्या भाषेत ‘अॅसरटिव्हनेस’ म्हणजेच ‘आपले म्हणणे शांत आणि संयमी पद्धतीने समोर ठेवणे, तसेच तत्त्वनिष्ठपणे चुकीच्या गोष्टीही न स्वीकारणे’, असे म्हणतात. असे असले, तरी ‘अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’ या वैद्यकीय संस्थेने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, रागामुळे व्यक्ती अधिक फलनिष्पत्ती देणारी बनते. यासमवेतच व्यक्ती तिची ध्येये गाठण्यासाठी एक शक्तीशाली प्रोत्साहक म्हणूनही पुढे येते.
१. ‘जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी’मध्ये प्रकाशित या शोध अभ्यासानुसार, राग या भावनेने सुख, दु:ख अथवा तटस्थ या भावनांच्या तुलनेत सर्वाधिक चांगले प्रदर्शन केले.
२. या अध्ययनासाठी १ सहस्र लोकांचे परीक्षण करण्यात आले. त्यात लक्षात आले की, सर्व प्रयोगांमध्ये रागामुळे लोकांच्या लक्ष्य प्राप्त करण्याच्या क्षमतेमध्ये वृद्धी झाली.
३. शोधनिबंधाचे मुख्य लेखक हीथर लेंच यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आव्हानांना सामोरे गेल्याने लक्ष्य प्राप्त करण्यासाठी बळ मिळते. सामान्यत: सुख ही एक आदर्श स्थिती असून आनंदप्राप्तीला लोक प्रामुख्याने त्यांच्या जीवनाचे ध्येय मानतात. सकारात्मक भावना मानसिक स्वास्थ्य आणि कल्याण यांसाठी आदर्श मानल्या जातात; परंतु आम्ही केलेल्या शोधात आढळून आले की, भावनांचे मिश्रण मग त्यात रागासारख्या नकारात्मक भावनांचाही भाग असला, तरी त्याचे सर्वांत चांगले परिणाम दिसतात.
४. या संशोधनात रागाला एक साधनाच्या रूपात उपयोग केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात.
५. ‘गुड शाऊट’ या संस्थेचे प्रमुख सूत्रधार निकोला केम्प यांच्यानुसार व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिले, तर हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, राग आणि निराशा सर्जनशीलता अन् रचनात्मकता प्राप्त करण्यासाठी एक मोठे उपकरण आहे. आपण हे ओळखले पाहिजे की, कार्यक्षेत्री कोणत्या गोष्टीवर क्रोधित होणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टीला गांभीर्याने आव्हान देणे आवश्यक आहे ! याने तुम्हाला तुमच्या भूमिकेच्या शक्तीचा अनुभव येऊ शकेल.