साई रिसॉर्ट पाडण्याचा मार्ग मोकळा ?
खेड – दापोलीतील बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ न पाडण्याचा खेड येथील दिवाणी न्यायालयाचा तात्पुरता आदेश खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडून रहित करण्यात आला. ‘साई रिसॉर्ट’चे मालक सदानंद कदम यांनी मुंबई येथे याचिका प्रविष्ट करण्यासाठी कालावधी लागणार असल्याचे सांगत रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दिवाणी न्यायालयाने १७ मार्च २०२३ या दिवशी हे रिसॉर्ट न पाडण्याचा आदेश दिला होता. या तात्पुरत्या आदेशाची समयमर्यादा (मुदत) ३० नोव्हेंबर २०२३ या दिवशी संपणार होती.
दिवाणी न्यायालयाच्या या तात्पुरत्या आदेशाला सरकारपक्षाकडून सत्र न्यायालयात आव्हान देत हा आदेश रहित करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. चांदगुडे यांनी दिवाणी न्यायालयाने दिलेला तात्पुरता आदेश रहित केला. या निर्णयामुळे आता साई रिसॉर्ट पाडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी अधिवक्त्या म्हणून अधिवक्त्या (सौ.) मेघना सुहास नलावडे यांनी काम पाहिले.