अमरनाथ गुहेपर्यंत रस्ता बनवून सीमा रस्ता संघटनेने घडवला इतिहास

श्रीनगर – सीमा रस्ता संघटनेने (बीआर्ओ) मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील डुमेलपासून बालटाल आधार शिबिरामार्गे अमरनाथ गुहेपर्यंत रस्ता बनवून  इतिहास घडवला आहे. वाहनांची पहिली तुकडी नुकतीच मंदिरापर्यंत पोचली. गेल्या वर्षी अमरनाथ मंदिराकडे जाणार्‍या दुहेरी मार्गांच्या रुंदीकरणाचे दायित्व सीमा रस्ता संघटनेवर (बीआर्ओ) सोपवण्यात आले होते. ‘बीआर्ओ’ च्या ‘प्रोजेक्ट बीकन’ मध्ये अमरनाथ यात्रा मार्गाची सुधारणा आणि जीर्णोद्धार यांचा समावेश होता.

(म्हणे) ‘हा इतिहास नाही, तर सर्वांत मोठा गुन्हा आहे !’- पीडीपी

मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष ‘पीडीपी’ने अमरनाथ यात्रा रस्ता बनवणे, हा इतिहास नाही, तर सर्वांत मोठा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. ‘पीडीपी’चे प्रवक्ते मोहीत भान म्हणाले की, केवळ राजकीय लाभासाठी धार्मिक तीर्थक्षेत्रांचे पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करणे निषेधार्ह आहे. काश्मीरमधील विध्वंसाला निमंत्रण देण्याचा हा प्रकार असल्याचे भान यांना म्हटले आहे. (‘पीडीपी’च्या राजवटीच्या कार्यकाळात  अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमणे व्हायची. त्या वेळी मोहीत भान यांनी यात्रेकरूंविषयी सहानुभूती दाखवल्याचे ऐकिवात नाही. विद्यमान सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने किमान सुविधा उपलब्ध केल्या, त्याची ‘पीडीपी’ला पोटशूळ का ? – संपादक)