54th IFFI 2023 : मायकेल डग्लस यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार !

५४वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

सर्वोत्कृष्ट ‘वेब सिरीज’ पुरस्कारासाठी १५ ओटीटी व्यासपिठावरून १० भाषांमध्ये ३२ प्रवेशिका दाखल !

(‘ओटीटी’ म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ ! आस्थापनांनी थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी दिलेली सेवा)

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर

नवी देहली, ६ नोव्हेंबर : ५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २० ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गोव्यात होणार आहे. जागतिक स्तरावर ५ व्या क्रमांकावर असलेला भारतातील प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योग, ही देशाची लक्षात घेण्याजोगी शक्ती आहेे. गेल्या ३ वर्षांत सरासरी २० टक्के वार्षिक वाढीसह हा उद्योग प्रतिवर्षी वाढत आहे. भारतात बनलेल्या चित्रपटांनी देशाचा कानाकोपरा व्यापला आहेच आणि आता ते जगाच्या सर्वदूर कानाकोपर्‍यातही पोचले आहेत, असे गौरवोद्गार अनुराग ठाकूर यांनी काढले. ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी नवी देहली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते माहिती देत होते.

यावर्षीचा ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ जागतिक चित्रपट सृष्टीतील एक चमकता तारा आणि चित्रपट विश्‍वातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाणारे मायकल डग्लस यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागात चित्रपटांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे. यातून इफ्फीसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योगाचे आकर्षण वाढत असल्याचे दिसून येते. कोरोना महामारीपासूनच्या काळात ओटीटी व्यासपिठाने भारतात जम बसवला आहे आणि या व्यासपिठाद्वारे भारतात निर्माण होत असलेल्या आशयघन कलाकृती सहस्रो लोकांना रोजगार देत आहेत. प्रतिवर्षी सुमारे २८ टक्के वाढ नोंदवणार्‍या या क्षेत्राच्या चैतन्यपूर्ण विकासाला प्रतिसाद म्हणून मंत्रालयाने ओटीटी व्यासपिठावरील उत्कृष्ट आशय निर्मात्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार चालू केला आहेे. यावर्षीच्या महोत्सवात या पुरस्कारासाठी १५ ओटीटी व्यासपिठांवरून १० भाषांमधील एकूण ३२ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून विजेत्यांना १० लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल.’’

चित्रपट क्षेत्रातील स्टार्टअप प्रणालीला चालना देण्यासाठी, तसेच देशाच्या दुर्गम भागातील, कानाकोपर्‍यातील प्रतिभावंतांचा शोध घेण्यासाठी ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ उपक्रम चालू केला आहे, असे त्यांनी सांगितले. या वर्षी या विभागात ६०० हून अधिक प्रवेशिका दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली.

इफ्फी हा जगातील सर्वांत मोठा चित्रपट आणि सांस्कृतिक महोत्सव आहे, असे  माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल्. मुरुगन यांनी त्यांच्या संक्षिप्त निवेदनात सांगितले. या चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय ज्युरीचे नेतृत्व प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर करणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.


महोत्सवाच्या कालावधीत आयनॉक्स पणजी (४ स्क्रीन ), मॅक्वीनेज पॅलेस (१ स्क्रीन), आयनॉक्स पर्वरी (४ स्क्रीन), झेड स्क्वेअर सम्राट अशोक (२ स्क्रीन), अशा ४ ठिकाणी २७० हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील.

५४व्या इफ्फीच्या ‘आंतरराष्ट्रीय विभागा’त ५३व्या इफ्फीपेक्षा १८ अधिक म्हणजे १९८ चित्रपट असतील. यात १३ वर्ल्ड प्रिमियर्स, १८ इंटरनॅशनल प्रिमियर्स, ६२ एशिया प्रिमियर्स आणि ८९ इंडिया प्रिमियर्स असतील. यावर्षी इफ्फीमध्ये १०५ देशांमधून २ सहस्र ९२६ चित्रपटांसाठी विक्रमी प्रवेशिका प्राप्त झाल्या, ज्या गेल्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय प्रवेशिकांच्या तुलनेत ३ पट अधिक आहेत.