तेल अविव (इस्रायल) – इस्रायली सैन्य हमासची ठिकाणे आणि सुरुंग शोधून त्यांच्यावर आक्रमण करत आहे. त्यामुळे आता इस्रायली सैनिक आणि हमासचे आतंकवादी यांच्यात थेट युद्ध चालू झाले आहे. अशातच हमास त्याच्या अनेक आतंकवाद्यांना इजिप्तमध्ये पाठवत असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. गाझा आता दोन भागांत विभागले असून दक्षिण गाझामध्ये मानवी साहाय्य पोचवण्यात येत आहे. जर त्या क्षेत्रात हमासचा कुणी आतंकवादी पोचला, तर त्याला ठार मारले जात आहे. उत्तर गाझामध्ये युद्धाची तीव्रता वाढली आहे. तेथे पॅलेस्टिनी नागरिकांच्या जीविताला धोका आहे.
व्हाईट हाऊसने दावा केला आहे की, हमास गाझामधून निघत असलेल्या विदेशी नागरिकांच्या सूचीमध्ये त्याच्या आतंकवाद्यांचे नाव जोडत आहे. या माध्यमातून त्यांना इजिप्तमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे.