पुणे – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) महंमद शहनवाज आलम या आणखी एका आतंकवाद्याला अटक केली आहे. इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेच्या आतंकवादी कारवायांमध्ये तो सहभागी असल्याचे यंत्रणेने सांगितले आहे. आलम याच्या अटकेमुळे पुणे येथे आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांची संख्या ८ झाली आहे. आलम हा कोथरूड येथून पकडण्यात आलेल्या २ आतंकवाद्यांशी थेट संपर्कात होता; पण तो फरार झाला होता. झारखंड येथील हजारीबाग परिसरात तो रहात होता. आतंकवाद्यांना लपण्याचे ठिकाण म्हणून वापरण्याच्या उद्देशाने ‘रेकी’ (गुप्तपणे माहिती गोळा करणे) करण्यात आणि अद्ययावत् स्फोटकांसाठी साधने (आयईडी) बनवण्यात आलम याने सक्रीय भूमिका बजावली होती. त्यासह गोळीबाराचे प्रशिक्षण देण्यासाठी त्याने सक्रीय सहभाग नोंदवल्याची माहिती अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्यांनी दिली आहे.
पुणे येथे आतंकवादी कारवाया घडवून आणण्यासाठी आतंकवाद्यांना विशेष पद्धत राबवायची होती. त्यालाच ‘पुणे इसिस मोड्यूल’ असेही म्हणतात. पुणे येथे आतंकवादी कारवाया करून सामाजिक शांतता आणि धार्मिक सलोखा बिघडवणे हे इस्लामिक स्टेटचे उद्दिष्ट होते. इस्लामिक स्टेटकडून सातत्याने भारतविरोधी मोहिम राबवली जाते. देशात हिंसाचार घडवून आणण्यासाठी विविध माध्यमांतून इस्लामिक स्टेटकडून आजवर प्रयत्न करण्यात आले आहेत. ‘आतंकवाद्यांचा हिंसाचार घडवण्याचा डाव उधळून लावण्यासाठी यंत्रणेकडून सखोल अन्वेषण करण्यात येत आहे’, असे यंत्रणेच्या अधिकार्यांनी सांगितले.