Remove Dance Bar कळंगुट येथील ८ अनधिकृत ‘डान्स बार’ पाडण्याला पंचायत संचालनालयाची स्थगिती 

(प्रतिकात्मक चित्र)

म्हापसा, २ नोव्हेंबर (वार्ता.) : कळंगुट पंचायतीने पंचायत क्षेत्रातील अनधिकृत ८ ‘डान्स बार’ पाडण्याचे आदेश दिले होते आणि आदेशाच्या कार्यवाहीसंबंधी बांधकाम पाडणारे पथक, वीज खाते, पोलीस आदींना कळवण्यात आले होते; मात्र संबंधित ‘डान्स बार’च्या मालकांनी पंचायत संचालनालयाकडून आदेशाला स्थगिती मिळवल्याने पंचायतीला आदेशावर कार्यवाही करता आली नाही, अशी माहिती कळंगुट पंचायतीचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी दिली आहे.

कळंगुट सरपंच जोझफ सिक्वेरा

ते पुढे म्हणाले,

‘‘पर्यटनासमवेत चांगले आणि वाईट हे दोन्ही येत असते; मात्र यातून योग्य-अयोग्य याची आपण निवड केली पाहिजे. पंचायतीने पंचायत क्षेत्रात अनधिकृतपणे चालू असलेल्या ‘डान्स बार’चे सर्वेक्षण करून कायदेशीरदृष्ट्या सर्व कृती करून संबंधितांना अनधिकृत बांधकाम पाडण्यासंबंधी नोटिसा बजावल्या. नागरिक प्रत्येक वाईट कृतीला केवळ पंचायतीला दोष देत असतात; मात्र पंचायत कायद्याच्या दृष्टीने योग्य ते करतच असते. आम्ही ‘डान्स बार’, दलाल आदींच्या विरोधात आहोत. आम्ही सर्व कायदेशीर कृती करून अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जातो, तेव्हा त्यावर स्थगिती आणली जाते. कायद्याचा आम्हाला पाठिंबा मिळत नाही. कायदा सुस्पस्ट असता, तर असे झाले नसते.’’