जयपूर (राजस्थान) – अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’चे) अधिकारी नवलकिशोर मीणा यांना १५ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली राजस्थान भ्रष्टाचारविरोधी पथकाने त्यांना अटक केली. नवलकिशोर मीणा याचे साहाय्यक बाबूलाल मीणा यांनाही लाच स्वीकारतांना अटक केली. नवलकिशोर मीणा मणीपूर राज्यातील इंफाळ येथे अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. नवलकिशोर मीणा यांचा मध्यस्थ म्हणून बाबूलाल मीणा लाच मागत होता, असे भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या सूत्रांनी सांगितले.
१. मणीपूरमधील एका चिटफंड कंपनीच्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी आणि इतर सुविधा देण्याच्या नावाखाली आरोपीने कंपनीच्या पीडित व्यक्तीकडे १७ लाख रुपयांची मागणी केली होती; मात्र १५ लाख रुपये घेतांना त्याला पकडण्यात आले. हा सापळा राजस्थानच्या अलवरमध्ये रचण्यात आला होता.
२. भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी सांगितले की, अलीकडेच मणीपूरमध्ये काही लोकांविरुद्ध चिटफंड कंपनीच्या माध्यमातून फसवणूक केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी नवलकिशोर मीणा आणि त्यांचा साहाय्यक बाबूलाल मीणा पीडित व्यक्तीची मालमत्ता जप्त न करण्याच्या बदल्यात तिच्याकडे पैशांची मागणी करत होते.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचार निपटण्याचे दायित्व असलेले अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारीच भ्रष्ट असले, तर भ्रष्टाचार न्यून कधी होणार ? ‘अशा भ्रष्ट अधिकार्यांच्या विरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे’, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते ! |