केरळमध्ये ख्रिस्त्यांच्या प्रार्थनास्थळी ३ बाँबस्फोट

  • १ जण ठार, तर ३६ जण घायाळ

  • बाँबस्फोट घडवणारे अद्यापही अज्ञात

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील एर्नाकुलम्मधील कलामासेरी भागातील ख्रिस्ती धर्मियांच्या यहोवा प्रार्थनासभेच्या ठिकाणी सकाळी ९ च्या सुमारास लागोपोठ ३ बाँबस्फोट झाले. ५ मिनिटांत हे ३ स्फोट झाले. यात १ महिला ठार झाली, तर ३६ जण घायाळ झाले. हे बाँबस्फोट टिफीन बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. या घटनेचे अन्वेषण केरळ पोलिसांनी चालू केले असून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे पथकही घटनास्थळी पोचले होते. या प्रकरणी एका आरोपीने शरणागती पत्करल्याचे, तर अन्य एकाला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. २ दिवसांपूर्वी एर्नाकुलम्मध्ये हमासच्या समर्थनार्थ फेरी काढण्यात आली होती. या स्फोटांविषयी केरळच्या साम्यवादी आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. अन्वेषणानंतर अधिक माहिती मिळेल.

१. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री विजयन् यांच्याशी दूरभाषवरून या घटनेविषयी चर्चा केली. शहा यांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि राष्ट्रीय सुरक्षा पथक यांना घटनास्थळी जाऊन अन्वेषण करण्याचा आदेश दिला.

२. जामरा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती. गेले ३ दिवस येथे कार्यक्रम चालू होते. या कार्यक्रमाचे आयोजक असणार्‍या ‘जेहोवाज विटनेसेस संस्थे’चे स्थानिक प्रवक्ते टी.ए. श्रीकुमार यांनी सांगितले की, कन्व्हेन्शन हॉलमध्ये सकाळी प्रार्थना संपल्यानंतर काही सेकंदातच स्फोट झाले. पहिला स्फोट हॉलच्या मध्यभागी झाला. काही सेकंदांनंतर, हॉलच्या दोन्ही बाजूला आणखी २ स्फोट झाले. या वेळी येथे अनुमाने १ सहस्र लोक उपस्थित होते.

काय आहे यहोवा प्रार्थना सभा ?

‘यहोवा प्रार्थना सभा’ किंवा ‘यहोवा विटनेस’ हा एक ख्रिस्ती पंथ आहे. यांच्या काही मान्यता या मुख्य ख्रिस्ती धर्मापेक्षा वेगळ्या आहेत. जागतिक स्तरावर या पंथाचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जातात. यात बायबलवर आधारित चर्चा, नाटक, व्हिडिओ आदींचा वापर केला जातो.

डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने स्वीकारले बाँबस्फोटांचे दायित्व !

केरळचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) एम्.आर्. अजित कुमार म्हणाले की, थ्रिसूरमधील कोडकरा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने आत्मसमर्पण केले आहे. त्याने बाँबस्फोट घडवून आणल्याचा दावा केला आहे. त्याचे नाव डॉमिनिक मार्टिन आहे. त्याने असा दावा केला आहे की, तो यहोवा प्रार्थनासभेच्या एकाच गटाचा सदस्य होता. आम्ही त्याची चौकशी करत आहोत. आम्ही या प्रकरणाचे सर्वच अंगांनी अन्वेषण करत आहोत.

संपादकीय भूमिका 

  • जिहादी आणि जिहादी आतंकवादी यांना पाठीशी घालणारे शासनकर्ते, राजकीय पक्ष आणि निधर्मी संघटना असणार्‍या केरळमध्ये असे घडल्यास आश्‍चर्य ते काय ?
  • केरळमध्ये ही घटना घडल्यामुळे सर्वच निधर्मीवादी राजकीय पक्ष यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे. अशी घटना भाजप सत्तेवर असलेल्या राज्यांत घडली असती, तर याच पक्षांनी आकाशपाताळ एक करत भाजपवर टीका केली असती !
  • ३ दिवसांपूर्वी केरळमध्ये हमासच्या नेत्याने इस्लामी संघटनेच्या सभेत ऑनलाईन मार्गदर्शन केल्यानंतर अशी घटना घडते, हा नक्कीच योगायोग नाही, असेच कुणालाही वाटेल !