स्वसंरक्षणासाठी केली मागणी !
तेल अविव (इस्रायल) – हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर या दिवशी केलेल्या आक्रमणानंतर इस्रायली सैन्याने गाझाला नष्ट करण्यासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे गेल्या २० दिवसांत तब्बल दीड लाख इस्रायली नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ बंदुकीची अनुज्ञप्ती (लायस्नस) मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत अनुज्ञप्ती मिळण्याच्या मागणीसाठी केवळ ४७ लोकांनी अर्ज केले होते. त्यामुळे गेल्या २० दिवसांतील हे प्रमाण साडेतीन सहस्र पटींनी वाढले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसारित केला आहे.
इस्रायलमध्ये बंदुकीची अनुज्ञप्ती मिळण्यासाठी महिने लागतात; परंतु नागरिकांकडून वाढलेल्या प्रचंड मागणीकडे पहाता सरकार काही दिवसांतच अर्जांवर निर्णय देत आहे. बंदूक चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाच्या मागणीतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती बंदूक प्रशिक्षक जिम सेमेश यांनी दिली.