४ वर्षांतून एकदा होणारी हिंदूंचे जागतिक व्यासपीठ असलेली ‘द वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ यंदा थायलंडमध्ये !

  • २४-२६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन !

  • हिंदु महामेळ्याला उपस्थित रहाण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !

नवी देहली – प्रत्येक ४ वर्षांनी आयोजित होणारी ‘द वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ यंदा थायलंडची राजधानी बँकाक येथे आयोजित करण्यात आली आहे. पुढील महिन्यात म्हणजे २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत हा जागतिक हिंदु महामेळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. २५ ऑक्टोबर या दिवशी यासंदर्भातील अधिकृत माहिती संघटनेने तिच्या ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केली. या कार्यक्रमाला प.पू. माता अमृतानंदमयी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघाचे सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसाबळे यांसारखे हिंदुत्वनिष्ठ नेते संबोधित करणार आहेत.

‘द वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ हे जागतिक व्यासपीठ असून त्या माध्यमातून विविध देशांत अन् विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले हिंदू एकमेकांच्या संपर्कात येतात. या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होण्यासह ‘हिंदुहित एकत्रितरित्या कसे साध्य करता येईल ?’, यासाठी प्रयत्न केला जातो. ४ वर्षांतून होणार्‍या या कार्यक्रमात ७ समांतर परिषदा आयोजित केल्या जातात. यांमध्ये आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, संघटनात्मक, राजकीय या क्षेत्रांच्या समावेशासह ‘हिंदु महिला आणि युवा पिढी’ यांचे विशेष नेतृत्व आणि योगदान’ हे विषय असतात. या परिषदांमध्ये हिंदु समुदायासमोर असलेली जागतिक स्तरावरील आव्हाने आणि संधी यांवर विचार विनिमय केला जातो अन् त्यावर नेमकेपणाने उपाय काढण्यासाठी प्रयत्न केला जातो. या माध्यमातून हिंदूंची प्रगती आणि समृद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न होऊन मानवता अन् संपूर्ण जग यांच्या हिताचा विचार केला जातो, असे आयोजकांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितले आहे.

वर्ष २०१४ मध्ये हा कार्यक्रम देहलीत आयोजित करण्यात आला होता. त्यात ५३ देशांतील १ सहस्र ८०० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. वर्ष २०१८ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात आयोजित कार्यक्रमात ६० देशांतील २ सहस्र ५०० हिंदुत्वनिष्ठांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. ‘यंदा ३ सहस्र ५०० लोक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात’, असे आयोजकांनी कळवले आहे.

‘द वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये सहभागी होण्यासाठी हे करा !

whc-payment.com या लिंकवर जाऊन या कार्यक्रमात सहभागी होण्याचा अर्ज भरता येईल. कार्यक्रमात पुरुषांना सहभागी होण्यासाठी १० सहस्र ५०० थाय बॅट (थायलंडचे चलन) म्हणजे साधारण २४ सहस्र ५०० रुपये शुल्क आहे, महिला ७ सहस्र थाय बॅट (१६ सहस्र १०० रुपये), तर विद्यार्थ्यांसाठी ५ सहस्र २५० थाय बॅट (१२ सहस्र १०० रुपये) इतके शुल्क आहे. अधिक माहितीसाठी worldhinducongress.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.