आतंकवाद्यांना मृत इस्रायली युवतींवर बलात्कार करण्याचा होता आदेश !

  • हमासच्या पकडण्यात आलेल्या आतंकवाद्यांनी केला खुलासा !

  • एका इस्रायली नागरिकाचे अपहरण करून गाझामध्ये आणल्यास ८ लाख रुपये आणि एक सदनिका देण्याचे दिले होते आश्‍वासन !

तेल अविव (इस्रायल) – ७ ऑक्टोबर या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायली नागरिकांवर कशा प्रकारे अनन्वित अत्याचार केले, त्याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ इस्रायलच्या संरक्षण संस्थेने प्रसारित केला आहे. ‘इस्रायल सेक्युरिटीज अथॉरिटी’ या संस्थेने प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये इस्रायली सैन्याने पकडलेले हमासचे आतंकवादी इस्रायलची लहान मुले, महिला आणि पुरुष यांच्यावर त्यांनी किती भयावह अत्याचार केले’, हे सांगतांना दिसत आहे. यामध्ये आतंकवाद्यांनी सांगितले, ‘आम्हाला वरिष्ठांकडून सांगण्यात आले होते की, ठार मारलेल्या इस्रायली युवतींवरही बलात्कार करा; कारण ते केवळ शरीर आहे, व्यक्ती नाही !’

या व्हिडिओमध्ये पकडण्यात आलेल्या हमासच्या आतंकवाद्यांच्या अन्वेषणाची माहिती आहे. यात इस्रायली सैन्याने विचारलेल्या प्रश्‍नांना आतंकवादी उत्तर देत असल्याचे दिसत आहे. आतंकवाद्यांनी दिलेली धक्कादायक माहिती पुढे दिली आहे :

१. जो कुणी इस्रायली लोकांचे अपहरण करून त्यांना गाझामध्ये आणेल, त्याला १० सहस्र अमेरिकी डॉलर (८ लाख रुपयांहून अधिक) आणि १ सदनिका देण्यात येईल.

२. आम्हाला विशेषकरून वृद्ध महिला आणि लहान मुले यांचे अपहरण करण्यास सांगण्यात आले होते. यासह घरांना लुटण्यास सांगण्यात आले होते.

३. एका आतंकवाद्याने सांगितले की, आम्ही चारचाकी वाहनाने किबुट्झ शहरात पोचलो. आम्ही तेथील घरांवर आक्रमण केले. जोपर्यंत तेथील सर्व लोक ठार होत नाहीत, तोपर्यंत घरांवर ग्रेनेड फेकले आणि गोळीबार करत राहिलो. आम्हाला आमच्या कमांडरने सांगितले की, लोकांचे डोके आपटा, त्यांचे हात-पाय कापून टाका !

४. या व्हिडिओमध्ये इस्रायलच्या संरक्षण यंत्रणांनी स्पष्ट केले की, आम्ही हमासच्या सर्व आतंकवाद्यांना ठार करूनच दम घेऊ !

५.  ७ ऑक्टोबर या दिवशी हमासचे २ सहस्र ५०० हून अधिक आतंकवादी भूमी, समुद्र आणि हवाईमार्गे दक्षिण इस्रायलमध्ये घुसले होते. या वेळी १ सहस्र ४०० हून अधिक लोकांना ठार करण्यात आले. यामध्ये बहुतांश लोक हे इस्रायली नागरिक होते. ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिलेल्या माहितीनुसार हमासने कमीत कमी २२२ इस्रायली नागरिकांचे अपहरण करून गाझामध्ये नेले.