राज कुंद्रा यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
मुंबई – कारागृहात बंदीवान उघडपणे धूम्रपान करतात. त्यामुळे कारागृह धुराने भरते. याचा अन्य बंदीवानांना त्रास होतो, अशी तक्रार उद्योजक राज कुंद्रा यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रामध्ये कारागृहात बंदीवानांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचे म्हटले आहे.
कारागृहात बंदीवानांची गर्दी आहे. बंदीवानांची गर्दी असल्याचे प्रशासन मान्य करते; मात्र त्यावर उपाययोजना काढली जात नाही. ज्या ‘बॅरेक’मध्ये ४९ बंदीवानांची जागा आहे, तेथे २५० बंदीवान ठेवण्यात आले आहेत. रात्री झोपतांना कुणीही हालचाल करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. ‘नवीन बंदीवांनाना गर्दीच्या मध्यभागी झोपण्यास सांगितले जाते’, असे या तक्रारीमध्ये राज कुंद्रा यांनी म्हटले आहे. जुलै २०२१ मध्ये अश्लील व्हिडिओंची निर्मिती करत असल्याच्या कारणावरून मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केली होती. या प्रकरणात कुंद्रा २ मास आर्थर रोड कारागृहात होते. सध्या ते जामिनावर कारागृहाच्या बाहेर आहेत.
संपादकीय भूमिकाभारतातील कारागृहांच्या दुरवस्थेविषयी बरीच माहिती समोर आली आहे; मात्र त्यात सुधारणा करण्याविषयी सरकारी यंत्रणांकडून कृती केली जात नाही, हे संतापजनक होय ! |