अलाहाबाद विश्वविद्यालयातील प्राध्यापक डॉ. विक्रम हरिजन यांची संतापजनक पोस्ट !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – आज प्रभु श्रीराम असते, तर ऋषी शंभुक यांची हत्या केल्यासाठी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत त्यांना कारागृहात टाकण्यात आले असते. श्रीकृष्ण असते, तर महिलांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी त्यांनाही कारागृहात टाकले असते, अशी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणारे प्राध्यापक डॉ. विक्रम हरिजन यांच्यावर प्रयागराज येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे’, असे कर्नलगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंद यादव यांनी सांगितले.
प्रा. डॉ. विक्रम हरिजन अलाहाबाद विश्वविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत. ते मध्यकालीन इतिहास शिकवतात. विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि हिंदु जागरण मंच या हिंदु संघटनांनी प्रा. डॉ. विक्रम हरिजन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रा. डॉ. विक्रम त्यांच्या विधानावर ठाम !
मी इतिहासाचा शिक्षक आहे. पुस्तके वाचतो. पुस्तक वाचूनच मी ती पोस्ट लिहिली आहे, असे प्रा. डॉ. विक्रम यांनी म्हटले आहे. यापूर्वीही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडीओ प्रसारित झाला होता. (अशांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते गुन्हे करत आहेत, हे पोलिसांना आणि प्रशासनाला कधी कळणार ? – संपादक)
संपादकीय भूमिकाअन्य धर्मियांच्या देवतांविषयी असे म्हणण्याचे धाडस प्रा. विक्रम यांनी केलेले नाही; कारण तसे केले, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा निघेल, हे त्यांना ठाऊक असणार ! |