१. कुतूबमिनारशी संबंधित खटल्यात साहाय्यक अधिवक्ता म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे
वर्ष २०१९ मध्ये श्रीकृष्णाच्या कृपेने मला पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या समवेत धर्मकार्याशी संबंधित खटल्यांमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. त्यात सर्वप्रथम कुतूबमिनारशी संबंधित खटल्याची सेवा चालू झाली. त्या वेळी मी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कच्चा मसुदा लिहिण्याची सेवा केली. तेव्हा मला त्यांची संशोधन करण्याची पद्धत अतिशय अद्भुत असल्याचे दिसून आले. मसुदा पूर्ण लिहून झाल्यानंतर खटला प्रत्यक्षात प्रिवष्ट करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘या खटल्यात तुमचेही नाव माझे साहाय्यक-अधिवक्ता म्हणून घालावे, अशी माझी इच्छा आहे. तुमचेही वकीलपत्र (फिर्यादी पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अधिकृत अधिवक्ता म्हणून नेमणूक करणे) भरले, तर तुम्हाला भीती वाटणार नाही ना ?’’ त्या वेळी मी म्हटले, ‘‘साक्षात् ईश्वर, गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि आपण माझ्या समवेत असतांना मला कशाची भीती असणार ? मी मुळीच घाबरणार नाही.’’
२. खटला प्रविष्ट करून घेण्यास न्यायालयाची मान्यता
आमचा हा दिवाणी खटला प्रविष्ट करण्यात आला, तेव्हा देहलीच्या दिवाणी न्यायाधिशांनी त्याला न्यायालयात सादर होण्यापूर्वीच रहित केला (निकालात काढला). कोणत्याही सूचनेविना आमचा खटला निकालात काढल्यानंतर आम्ही अर्ज केला. आमचा अर्ज पहिल्यांदा सूचीत समाविष्ट केला. तेव्हा जिल्हा न्यायाधिशांच्या न्यायालयात पू. हरि शंकर जैन मला म्हटले ,‘‘तुम्ही न्यायालयात जा आणि युक्तीवाद करून या.’’ मी त्यांच्याशी प्रत्यक्षात भेटू शकत नव्हते. त्यामुळे मी माझ्या घरून आणि ते त्यांच्या घरून ‘व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून संवाद साधत होते. ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही अशी कल्पना करा की, तुमच्या समोर न्यायाधीश बसले आहेत आणि तुम्ही युक्तीवाद करत आहात.’’ त्यांनी प्रत्येक सूत्र कसे मांडायचे, याची सिद्धता करून घेतली. त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सूत्रे नोंद करून घेतली आणि हुबेहूब तसेच्या तसे लक्षात ठेवून न्यायालयात जाऊन युक्तीवाद केला. ते जे सांगतात, त्यातील एक शब्दही न वगळता आणि एक शब्दही अधिक न सांगता युक्तीवाद केला. त्या न्यायाधिशांसमोर आमचा तो अर्ज सूचीवर आला होता. त्या न्यायाधीश अर्ज निकाली काढण्यात प्रसिद्ध होत्या. त्यामुळे माझ्या मनात एकदा विचार आला, ‘अशा न्यायाधिशांसमोर मला जावे लागत आहे.’ नंतर गुरुदेवांच्या कृपेने मला विचार आला, ‘त्या न्यायाधीश जो निवाडा देतील, तो तर मायेतील न्याय असेल; परंतु ईश्वराने आधीच न्याय लिहून ठेवला आहे आणि तो योग्य वेळ आल्यावर प्रत्यक्ष शब्दांतून सांगितला जाईल. मला तर केवळ स्वतःची भूमिका सादर करायची आहे. मला रामसेतू बांधण्याच्या ईश्वरी कार्यातील खारुताईसारखे योगदान द्यायचे आहे.’
मी न्यायाधिशांसमोर युक्तीवाद करणे चालू केले. मी म्हणाले, ‘‘येथे २७ हिंदु, जैन मंदिरे होती, जी कुतूबुद्दीन ऐबकने तोडली आणि त्या ठिकाणी मशीद बांधली.’’ न्यायाधिशांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला कसे समजले की, तेथे आधी २७ हिंदु, जैन मंदिरे होती. तुमच्याकडे काही पुरावा आहे का ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले की, आपल्या याचिकेत सर्व छायाचित्रे लावलेली आहेत. जेव्हा आपण कुतूबमिनारमध्ये प्रवेश करतो, तर तेथे एक मोठा काळा दगड आहे. त्यावर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने (‘आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने) लिहिले आहे की, येथे पूर्वी २७ हिंदु, जैन मंदिरे होती. जी तोडून कुतूबुद्दीन ऐबकने मशीद बनवली आहे. न्यायाधिशांनी वरील प्रश्न विचारल्यावर मला वाटले की, ‘न्यायालयीन कार्य करणारे हे जे लोक आहेत, ते आज स्वतःला सुशिक्षित समजतात. वास्तविक त्यांनाही आपल्या देशाचा खरा इतिहास ठाऊक नसावा, ही खेदाची गोष्ट आहे.’ कलियुगात न्यायालयीन कार्य करणार्यांचेही ज्ञान अतिशय मर्यादित आहे आणि ते केवळ कायद्यापर्यंतच सीमित आहे. नंतर ते न्यायाधीश उलट मला म्हणाले, ‘‘हा खटला पूजास्थळ (विशेष प्रावधान) अधिनियमात (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट) येतो.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘हा खटला त्या अधिनियमात येत नाही; कारण त्या अधिनियमातील उपविभाग ३ आणि ४ (प्लेसेस ऑफ वर्शिप सेक्शन ३ आणि ४) हा स्वतःच सांगतो की, असे कोणतेही स्मारक जे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या नियंत्रणात येते, त्या स्मारकाच्या जागेवर पूजास्थळ (विशेष प्रावधान) अधिनियम लागू होऊच शकत नाही.’’ त्यानंतर न्यायाधिशांनी त्वरित आदेश काढला. या एका यशानंतर मला असे वाटले की, एक लहानशी गोष्ट तरी प्राप्त झाली.
३. कुतूबमिनारमधील श्री गणेशमूर्ती तेथेच ठेवण्यास न्यायाधिशांची मान्यता
कुतूबमिनार खटल्याची सुनावणी चालू झाल्यानंतर १ ते २ मासानंतर पुरातत्व विभागाने एक अधिसूचना काढली. त्या अधिसूचनेत असे लिहिले होते, ‘कुतूबमिनारमध्ये श्री गणेशाच्या २ मूर्ती आहेत, त्या मूर्ती पिंजर्यात बंद करून ठेवलेल्या आहेत. त्यांना संग्रहालयात स्थलांतरित करण्यात येणार आहे.’ हे समजल्यावर आम्ही त्याच न्यायालयात आणखी एक अर्ज केला आणि त्यावर म्हटले, ‘‘या श्री गणेशाच्या मूर्ती आमच्या खटल्याचा मूळ पाया आहे, म्हणजे हा आमच्या अनेक पुराव्यांपैकी एक पुरावा आहे. या मूर्ती येथून घेऊन गेले, तर येथे आमच्या देवीदेवता होत्या, हे कसे सिद्ध करणार ?’’ तेव्हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिवक्त्याने म्हटले, ‘‘आता तर खटला प्रलंबित आहे, म्हणजे तुम्ही तेथे पूर्वी मंदिर होते आणि देवीदेवतांच्या मूर्ती होत्या, हे अजून सिद्ध केलेले नाही.’’ त्यावर न्यायाधिशांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिवक्त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही आता शांत रहा, तुम्हाला या मूर्ती कुठेही दुसरीकडे घेऊन जाता येणार नाहीत.’’ अक्षरशः अशा प्रकारचे त्यांचे शब्द होते. तेव्हा मला वाटले की, त्या वेळी न्यायाधीश नाही, तर साक्षात् ईश्वरच त्यांच्या मुखातून बोलत आहे.
४. सुनावणीला जाण्यापूर्वी पाय मुरगळून अपघात होणे
गेल्या १५ वर्षांपासून मी जेथे रहाते, ते घर वरच्या मजल्यावर आहे. मी जिन्याच्या पायर्या नेहमी चढ-उतार करत असते. एवढ्या दिवसांत मी कधीच पायर्या उतरतांना पडले नाही; परंतु ज्या दिवशी कुतूबमिनार खटल्याची सुनावणी होती, त्या दिवशी माझा जिन्यात पाय मुरगळला आणि मी पायर्यांवर खाली पडले. तेव्हा माझ्या गुडघ्याला बराच मार बसला. मी त्वरित एका संतांना संदेश पाठवून पाय मुरगळल्याची माहिती दिली.
५. श्रीकृष्ण जन्मभूमी खटल्याच्या वेळी श्रीकृष्णच पाठीशी असल्याने निर्भीडता अनुभवणे
मला भगवान श्रीकृष्ण जन्मभूमीच्या संदर्भात पू. (अधिवक्ता) जैन यांच्या समवेत कार्य करण्याची संधी मिळाली. याही वेळेस तसेच घडले. दिवाणी न्यायाधिशांनी आमची याचिका कोणतीही नोटीस न देता रहित केली. त्यातही आम्ही फिर्यादी होतो आणि त्या खटल्याचा अंतिम युक्तीवाद करायचा होता. एक दिवस पू. जैन म्हणाले, ‘‘न्यायालयात तुम्हीच अंतिम युक्तीवाद करा. मी तुमच्या मागेच बसलेलो असेन. तुम्ही अडखळत असल्याचे मला वाटले, तर मी त्याच क्षणी तुमच्या बाजूने उभा राहीन.’’ त्या वेळी माझ्या मनात थोडी भीती होती की, हे एवढे मोठे दायित्व ते मला देत आहेत. हा खटला साक्षात् भगवान श्रीकृष्ण जन्मभूमीविषयीचा आहे. त्यामुळे ही काही लहानसहान गोष्ट नाही. दुसर्या दिवशी सकाळी माझी भगवान श्रीकृष्ण, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. जैन यांच्या चरणी कृतज्ञताच व्यक्त होत होती.
२२.५.२०२२ या दिवशी अंतिम युक्तीवाद करायचा होता. तेव्हा पू. (अधिवक्ता) जैन मला म्हणाले, ‘‘मी एक दिवस आधी वृंदावन येथे जाईन आणि दुसर्या दिवशी तेथून मथुरा न्यायालयात येईन.’’ त्यानंतर रात्री ११ वाजता मला पू. जैन यांचा दूरभाष आला, ‘‘मला वाराणसी येथे ज्ञानवापी खटल्याच्या संदर्भात तातडीने जावे लागत आहे. त्यामुळे उद्या मी तुमच्यासह मथुरा न्यायालयात नसणार आणि तुम्हाला एकटीलाच तेथे युक्तीवाद करायचा आहे.’’ त्या वेळी मला वाटले की, ही गुरुदेवांची आज्ञा आहे आणि मला तिचे पालन करायचे आहे. दुसर्या दिवशी सकाळी मी मथुरा न्यायालयात जाण्यासाठी निघाले असता पू. जैन यांचे सहकारी माझ्यासह होते. खटल्याच्या संदर्भातील कागदपत्रांच्या धारिका आमच्या हातात होत्या. ते पाहून मला असे वाटले की, त्या धारिका नसून आमचे शस्त्र आहे. तेथे मुसलमान पक्षाच्या बाजूने ४ अधिवक्ते उपस्थित होते आणि हिंदूंच्या बाजूने केवळ मी एकटीच होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला की, माझ्या समवेत गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आहेत, तसेच मी कृष्णाच्या जन्मभूमीवर उभी असून साक्षात् भगवान कृष्ण माझ्यासह आहेत, तर मला काळजी करण्याची आवश्यकता काय ?
६. श्रीकृष्ण जन्मस्थान खटल्याचा निवाडा हिंदूंच्या बाजूने लागणे
खटल्याची सुनावणी चालू झाली. तेव्हा मुसलमान बाजूचे अधिवक्ते आक्रमकपणे बोलू लागले, ‘‘यांचा खटला एकदम खोटा आहे. येथे पूर्वीपासून मशीदच असून यांच्या कोणत्याही भगवंताचे जन्मस्थान नाही.’’ तेव्हा त्यांना मी म्हटले, ‘‘जर असे असेल, तर रामजन्मभूमीप्रमाणे येथेही सर्वेक्षण करून घेऊया. त्यामुळे सर्वांनाच समजेल की, हे कृष्णाचे जन्मस्थान आहे कि नाही ? सर्व सत्य जगासमोर येईल.’’ थोड्या दिवसांनंतर या खटल्याचा निर्णय आमच्या बाजूने आला. जिल्हा न्यायाधिशांनी लिहिले होते, ‘दिवाणी न्यायाधिशांनी हा खटला कोणत्याही कारणाविना रहित केला होता.’ हे एक लहानसे यश पाहून असे वाटले, ‘सर्वकाही ईश्वरच करत असून तो आपल्याला आनंद देत आहे.’
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी एकदा म्हटले होते, ‘‘पांडवांनी भगवान कृष्णाची नारायणी सेना निवडली नव्हती, तर भगवंताला निवडले होते. त्याचप्रमाणे आपणही भगवंताला निवडायचे कि नारायणी सेनेला निवडायचे ?’’ मला वाटते की, मी भगवंताला निवडण्याऐवजी भगवंतानेच माझी निवड केली आहे आणि या धर्मकार्यात माझे खारुताईसारखे योगदान करून घेत आहे. मला ही सर्व ईश्वराची लीलाच वाटते. आपण काही करत आहोत, असे मला वाटतच नाही.
– अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा, नवी देहली.
अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांचा संक्षिप्त परिचयअधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा या ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’च्या देहली येथील सदस्या आहेत. त्या कुतूबमिनार आणि श्रीकृष्ण जन्मभूमी या खटल्यांची बाजू मांडत आहेत. तसेच त्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अधिवक्त्यांचे संघटनही करत आहेत. त्यावर त्यांचा मला संदेश आला, ‘चिंता करू नये. ईश्वर तुमच्या समवेत आहे.’ याचा अर्थ ईश्वर आपल्या समवेत आहे आणि जे काही करायचे आहे, ते तोच करणार आहे. आपल्याला केवळ स्वतःला दिलेली भूमिका पार पाडायची आहे. |
‘मी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने साधना आरंभ केली आहे. तेव्हापासून माझे जीवन संपूर्णपणे पालटले आहे. माझ्यामध्ये आता निर्भयता आणि सकारात्मकता आली आहे. माझ्या मनात कुठेतरी जो भयाचा अंश होता, तो आता पूर्णपणे नष्ट झाला आहे.
– अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा |