दाभोलकर-पानसरे हत्येच्या भरकटलेल्या तपासाच्या कथा
‘वर्ष २०१३ मध्ये अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, वर्ष २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे आणि साहित्यिक प्रा. एस्.एम्. कलबुर्गी अन् वर्ष २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश या पुरोगाम्यांच्या हत्यांमागे हिंदुत्वनिष्ठ आणि विशेषतः सनातन संस्थेचा हात आहे, असे येनकेन प्रकारेण सिद्ध करण्याचा आटापिटा त्यांच्या हत्या झाल्यापासून चालू आहे. यामध्ये आतंकवादविरोधी पथक (ए.टी.एस्.), सीबीआय, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) या राष्ट्रीय स्तरावरील विविध अन्वेषण यंत्रणांना ठोस पुरावे मिळत नसल्याने त्यांचीही पंचाईत झाल्याचे चित्र समोर येत आहे.
पुरोगाम्यांच्या हत्यांतील अन्वेषणाची विविध अन्वेषण यंत्रणांनी गेली अनेक वर्षे चालवलेली भली मोठी प्रक्रिया आणि गुंतागुत, तसेच सनातनच्या साधकांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याच्या अट्टहासापोटी अन्वेषण यंत्रणांनी जमवलेले खोटेनाटे पुरावे, रचलेल्या कपोलकल्पित कथा, त्यासाठी राबवलेली यंत्रणा अन् व्यय केलेले सहस्रो रुपये, घालवलेला वेळ, वेळोवेळी त्यांना न्यायालयाने ऐकवलेले बोल अन् या सर्वांतून अन्वेषणावर निर्माण होणारी अनेक प्रश्नचिन्हे यांविषयीची थोडक्यात मांडणी करणारे ‘दाभोलकर-पानसरे हत्या तपासातील रहस्ये ?’, हे पुस्तक ‘उद्वेली बुक्स’ या प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
त्यातील ‘तपासातील एक अनुत्तरित प्रश्न : गेले पिस्तुल कुणीकडे ?’ या एकाच प्रकरणावरून या तपासातील सर्वसामान्यांनाही अगदी सहज लक्षात येतील अशा त्रुटी पुढे येतात. याविषयीचा भाग आपण १५ ऑक्टोबर २०२३ या दिवशीच्या लेखात वाचला. या यंत्रणांचे अन्वेषण पाहून अक्षरशः ‘हसावे कि रडावे ?’, हेच कळत नाही. या अन्वेषणातून हिंदूंची आणि सनातनच्या साधकांची जी घोर फसवणूक अन् पिळवणूक होत आहे, त्याला तोड नाही. पुरोगामी आणि प्रशासकीय यंत्रणा यांची विकृत अन् हिंदुद्वेषी मानसिकता या अन्वेषणातून उघड होते. साम्यवाद्यांच्या वर्षानुवर्षे चालू असलेल्या हिंदूंविरोधातील अनेक स्तरांवरील लढा आणि त्यांनी केलेल्या सहस्रो हत्या पहाता ४ साम्यवाद्यांच्या हत्यांचे खापर हिंदूंवर फोडण्याचा त्यांचा आटापिटा या मोठ्या अन्वेषणातील या एका प्रकरणातूनही लक्षात येईल. (या लेखात पुस्तकातील भाग जसाच्या तसा येथे देत आहोत.) (भाग २)
या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/728417.html
१. यापूर्वीच्या लेखात आपण वाचले की, खंडेलवाल आणि नागोरी यांच्याकडील पिस्तूल दाभोलकर यांच्या खुनात वापरले गेल्याचा अहवाल मुंबई येथील ‘फॉरेन्सिक लॅब’ने दिला होता. हे पिस्तूल पुणे पोलिसांनी त्यांच्या कह्यात घेतले आणि त्यांच्याकडून अन्वेषण हस्तांतरित झाल्यावर ते पिस्तूल ‘सीबीआय’कडे आले होते !
२. या पार्श्वभूमीवर बेंगळुरू ‘फॉरेन्सिक लॅब’च्या म्हणण्यानुसार जर दाभोलकर खुनातील पिस्तूल पानसरे यांच्या खुनात वापरलेले होते, तर त्याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की, ‘सीबीआय’च्या कोठडीतून ते पिस्तूल बाहेर आले. कुणीतरी कोल्हापूरला ते घेऊन गेले. त्या पिस्तुलातून पानसरेंना गोळ्या घालण्यात आल्या आणि मग ते पिस्तूल पुन्हा अलगद ‘सीबीआय’च्या कपाटात येऊन आपल्या जागेवर बसले !
त्याच्यावरच्या हातांच्या ठशांना पुसले गेले असावे आणि कुठेच ते पिस्तूल बाहेर पडल्याची नोंद झाली नसावी, म्हणजे ‘सीबीआय’चा अधिकारी गुन्हेगार आहे का ? असे अन्वेषण व्हायला नको होते का ? कोल्हापूर पोलिसांनी याचे अन्वेषण अजिबातच केले नाही, असे का ?
३. आपल्यावर येणारी संशयाची सुई पुन्हा झटकावी, म्हणून ‘सीबीआय’ मुंबई उच्च न्यायालयाला सांगत राहिले की, या २ ‘फॉरेन्सिक लॅबोरेटरीज’च्या अन्वेषणातील गफलत दूर करण्यासाठी अथवा ‘नेमके काय आहे ?’, ते बघण्यासाठी आम्हाला दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या तिन्ही खून प्रकरणातील मृतदेहांमधील गोळ्या आणि आसपास पडलेल्या रिकाम्या पुंगळ्या ‘स्कॉटलंड यार्ड, इंग्लंड’ यांना पाठवायचे आहेत. ‘तसे पाठवू शकतो’, असा करारच नव्हता.
समीर गायकवाडच्या वतीने अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी वारंवार ‘असा करार नसतांना, हे उच्च न्यायालयाला असे कसे सांगत आहेत ?’, हे दाखवण्याचा प्रयत्न केला; परंतु ऐकणार कोण होते ? शेवटी जानेवारी २०१७ मध्ये ‘सीबीआय’ने मुंबई उच्च न्यायालयाला असे सांगितले की, आम्ही ‘स्कॉटलंड यार्ड’ला हे सगळे पाठवण्याचा नाद सोडून दिला आहे. आम्ही आता गुजरातमधील एका लॅबोरेटरीत पुन्हा पडताळून घेतले आहे.
४. गौरी लंकेश खून प्रकरणी अटक झाल्यावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी ‘आता तरी तपास होणार का ?’, अशा स्वरूपाचे प्रश्न याचिकेच्या सुनावणीच्या वेळी विचारणे चालू केल्यावर ‘सीबीआय’ने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना अटक केली.
शरद कळसकरला ‘सीबीआय’च्या अटकेनंतर पुढे गौरी लंकेश खून प्रकरणी कर्नाटकातील विशेष अन्वेषण पथकाने अटक केली आणि गमतीची गोष्ट अशी की, जो शरद कळसकर ‘ए.टी.एस्.’कडे काही बोलला नव्हता, ‘सीबीआय’कडे काही बोलला नव्हता, त्याने कर्नाटकात जाऊन आपला कबुलीजबाब (?) दिला.
त्यात तो असे म्हणतो, ‘जे पिस्तूल दाभोलकरांच्या खुनात वापरले, ते पिस्तूल म्हणजे ती दोन्ही पिस्तुले त्यांनी एका बॅगेत ठेवली आणि ती बॅग पुण्यातच सोडून दोघेही त्यांच्या गावी निघून गेले होते. जुलै २०१८ मध्ये त्याच्याकडील अशी ३-४ पिस्तुले घेऊन शरद कळसकर ठाणे जिल्ह्यातील एका खाडीवरील पुलावर गेला. पिस्तुलाचे ‘स्पेअर पार्ट’ (सुटा भाग) काढून त्याने तो खाडीत फेकून दिला. काही अंतर चालून त्याने दुसरा स्पेअर पार्ट काढून फेकला, अशा पद्धतीने त्याने ३-४ पिस्तुलांची विल्हेवाट लावली. हे त्याने अधिवक्ता पुनाळेकर यांच्या सांगण्यानुसार केले.’’
पिस्तुले शोधण्याची सर्वांना मूर्ख बनवणारी संतापजनक मोहीम !
हे पिस्तूल शोधण्यासाठी ‘सीबीआय’ने मोठीच मोहीम हाती घेतली. साधारण साडेसात कोटी रुपयांचा खर्च करून, नॉर्वेचे पाणबुडे आणून, दुबईच्या एका कंपनीला कंत्राट देऊन राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांच्या परवानग्या काढून, शेवटी या पाणबुड्यांनी त्या खाडीचा तळ गाठला.
त्यांच्या तंत्रांनी तो भाग चाळून काढला; पण खाडीत पिस्तुलाचे पार्ट फेकले, तो काळ होता २०१८ चा जुलै महिना, तर शोधाचा काळ होता वर्ष २०२० चा ! खरे तर पिस्तुलाचे गंजलेले तुकडे मिळायला पाहिजे होते. तसे तुकडे या पाणबुड्यांना मिळालेच नाहीत, तर अखेर एक अख्खे पिस्तूल त्यांना मिळाले !
लहानपणी लाकूडतोड्याची गोष्ट होती. त्याची लाकडाचा दांडा असणारी कुर्हाड पाण्यात पडली, तर सोन्याचा दांडा असणारी कुर्हाड बाहेर कशी आली ? वगैरे वगैरे. त्या गोष्टीमध्ये होते तसे इथे झाले का ? तुकडे सापडलेच नाहीत, तर मग सगळे तुकडे पाण्यात एकत्र आले, एकमेकांना साधले गेले आणि अनेक पिस्तुलाच्या ‘स्पेअर पार्ट’मधून एक वेगळेच पिस्तूल तयार झाले. असे झाले का ?
बर्याच चर्चेनंतर ‘सीबीआय’ने ‘खाडीत सापडलेले ते पिस्तूल हत्येत वापरले गेले नव्हते’, असे जाहीर केले आणि अनेक प्रश्न पडदा पडण्याची वाट बघत तसेच राहिले.
त्यातील काही प्रश्न खालीलप्रमाणे :
अ. साक्षीदार २ पिस्तुले वापरली म्हणतात आणि फॉरेन्सिक लॅब ‘एकच पिस्तूल वापरले’, असे म्हणते. यातील नेमके खरे कोण ? जो खोटारडा आहे त्याला काय शिक्षा होणार ?
आ. शरद कळसकरचा कबुली जबाब खरा मानला, तर जिथे त्याने पिस्तुलांचे तुकडे टाकले, तिथे तुकडे मिळायला पाहिजे होते. अख्खे पिस्तूल बाहेर कसे आले ? मग कबुली जबाब खोटा आहे, असाच त्याचा अर्थ होत नाही का ? अधिवक्ता पुनाळेकर यांची अटक चुकीची होती, हेच हा तपास दाखवत नाही काय ?
इ. जर ‘कन्फेशन’ (स्वीकृती) खरे मानले, तर ऑगस्ट २०१३ ते जुलै २०१८ असा प्रदीर्घ काळ ते पिस्तूल कुठे होते ? याचा शोध घ्यायला नको का ?
ई . प्रश्न असा निर्माण होतो की, सत्र न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालय पालटते आणि उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालय पालटते अथवा पालटू शकते; पण तंत्रज्ञानाचा मुद्दा येतो, तिथे तिन्ही लॅबोरेटरीज् एकाच स्तरावरच्या होत नाहीत का ?
‘याचा अहवाल त्यांनी पालटला, त्यांचा अहवाल पुढच्याने पालटला’, असे कसे होऊ शकते ? याचाच अर्थ आधी तरी खोटे सांगितले गेले किंवा शेवटी तरी खोटे सांगितले जात आहे. याचा तपास कोण करणार ?
‘मॉर्निंग वॉक’ला (सकाळी फिरायला जाणे) गेलेल्यांची हत्या : एक मिथक !
डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली, तेव्हा बातम्या प्रकाशित झाल्या की, ते ‘मॉर्निंग वॉक’ला गेले होते. बातमीदारांना ‘ते मॉर्निंग वॉक’ला गेले होते, हे कुणी सांगितले, हाही एक प्रश्नच आहे. असो.
त्याचा आज शोध घेणे कठीण आहे. कॉ. पानसरे यांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या सुनेचे भाऊ मुकुंद कदम यांनी प्रारंभीच्या तक्रारीत म्हटले होते की, पानसरे पती-पत्नी नेहमीप्रमाणे ‘मॉर्निंगग वॉक’ करून परतत असतांना ही घटना घडली.
सामान्यतः सकाळी ८ पूर्वी मॉर्निंग वॉक’ केला जातो. सकाळी ९ नंतर तर कुणीही ‘मॉर्निंग वॉक’ला जात नसते. त्यामुळे तो खरोखर ‘मॉर्निंग ग वॉक’ होता का ? हा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु पोलिसांनी आरोपपत्रात स्पष्ट लिहिले आहे की, सकाळी ९.२५ वाजण्याच्या सुमारास पानसरे पती-पत्नी नाश्ता करून परतत असतांना ही घटना घडली.
म्हणजेच पानसरे पती-पत्नी ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेले नव्हते; परंतु तोपर्यंत मुकुंद कदम यांच्या तक्रारीचा आधार घेऊन कम्युनिस्ट (साम्यवादी) प्रचारकी मंडळींनी प्रसारमाध्यमांमध्ये ‘मॉर्निंग वॉक’चे मिथक रचण्यात यशस्वी झाले.
प्रश्न हा आहे की, ‘पानसरे हत्येची कायदेशीर लढाई लढणार्या सूनबाई मेधा पानसरे ज्या त्याच घरात रहात होत्या, त्यांनी सासू आणि सासरे यांना न्याहारी का दिली नव्हती ?’, याचे स्पष्टीकरण कोल्हापूर पोलीस का विचारत नाहीत ?
‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या बुद्धीवाद्यांच्या हत्या हे मिथक आहे. एक खोटे अनेक वेळा सांगितले की, ते लोकांना खरे वाटते, हे दुसर्या महायुद्धातील जर्मनीचा प्रचारमंत्री डॉ. जोेसेफ गोबेल्सचे कथन दुर्दैवाने ‘मॉर्निंग वॉक’च्या प्रचारासंदर्भात खरे ठरले !
– डॉ. अमित थढानी, प्रसिद्ध शल्यचिकित्सक, मुंबई.
(साभार : ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’, या पुस्तकातून)
हे पुस्तक ‘अमेझॉन’ च्या संकेतस्थाळावर पुढील लिंक वर विक्री साठी उपलब्ध आहे : https://amzn.eu/d/7h8m1Sx