‘वर्ष २०१३ मध्ये अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, वर्ष २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे आणि साहित्यिक प्रा. एस्.एम्. कलबुर्गी अन् वर्ष २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश या पुरोगाम्यांच्या हत्यांमागे हिंदुत्वनिष्ठ आणि विशेषतः सनातन संस्थेचा हात आहे’, असे येनकेन प्रकारेण सिद्ध करण्याचा आटापिटा त्यांच्या हत्या झाल्यापासून चालू आहे. यामध्ये आतंकवादविरोधी पथक (ए.टी.एस्.), ‘सीबीआय’, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) या राष्ट्रीय स्तरावरील विविध अन्वेषण यंत्रणांना ठोस पुरावे मिळत नसल्याने त्यांचीही पंचाईत झाल्याचे चित्र समोर येत आहे.
पुरोगाम्यांच्या हत्यांतील अन्वेषणाची विविध अन्वेषण यंत्रणांनी गेली अनेक वर्षे चालवलेली भली मोठी प्रक्रिया आणि गुंतागुत, तसेच सनातनच्या साधकांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याच्या अट्टाहासापोटी अन्वेषण यंत्रणांनी जमवलेले खोटेनाटे पुरावे, रचलेल्या कपोलकल्पित कथा, त्यासाठी राबवलेली यंत्रणा अन् व्यय केलेले सहस्रो रुपये, घालवलेला वेळ, वेळोवेळी त्यांना न्यायालयाने ऐकवलेले बोल अन् या सर्वांतून अन्वेषणावर निर्माण होणारी अनेक प्रश्नचिन्हे यांविषयीची थोडक्यात मांडणी करणारे ‘दाभोलकर-पानसरे हत्या तपासातील रहस्ये ?’, हे पुस्तक ‘उद्वेली बुक्स’ या प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
त्यातील ‘तपासातील एक अनुत्तरित प्रश्न : गेले पिस्तुल कुणीकडे ?’ या एकाच प्रकरणावरून या अन्वेषणातील सर्वसामान्यांनाही अगदी सहज लक्षात येतील अशा त्रुटी पुढे येतात. या यंत्रणांचे अन्वेषण पाहून अक्षरशः ‘हसावे कि रडावे ?’ हेच कळत नाही. या अन्वेषणातून हिंदूंची आणि सनातनच्या साधकांची जी घोर फसवणूक अन् पिळवणूक होत आहे, त्याला तोड नाही. पुरोगामी आणि प्रशासकीय यंत्रणा यांची विकृत अन् हिंदुद्वेषी मानसिकता या अन्वेषणातून उघड होते. साम्यवाद्यांच्या वर्षानुवर्षे चालू असलेल्या हिंदूंविरोधातील अनेक स्तरांवरील लढा आणि त्यांनी केलेल्या सहस्रो हत्या पहाता ४ साम्यवाद्यांच्या हत्यांचे खापर हिंदूंवर फोडण्याचा त्यांचा आटापिटा या मोठ्या अन्वेषणातील या एका प्रकरणातूनही लक्षात येईल. (या लेखात पुस्तकातील भाग जसाच्या तसा येथे देत आहोत.)
१. तपासातील एक अनुत्तरित प्रश्न : गेले पिस्तुल कुणीकडे ?
डॉ. दाभोलकरांच्या हत्येमध्ये अग्नीशस्त्राचा, म्हणजेच पिस्तुलाचा वापर झाल्याचा पुणे पोलिसांचा दावा होता. दाभोलकर खून आणि त्या खुनात वापरलेले पिस्तूल हे एक फार मोठेच गौडबंगाल आहे. या प्रकरणाकडे बघण्याआधी ‘तपास कसा असावा ?’, याची जागतिक स्तरावरची काही तत्त्वे आधी समजून घेणे उपयुक्त ठरेल. ती खालीलप्रमाणे –
अ. तपास प्रामाणिक असावा.
आ. सूर्याचा किरण जसा पुढे पुढे एका दिशेने सरकतो, तसा तपास पुढे पुढे सरकावा. तो पुन्हा वळून मागे आला आणि गोल फिरत राहीला, असे तपासाचे होऊ नये.
इ. तपासाची मुळात स्वतःची एक कथा असावी. होत जाणारा तपास ती कथा घेऊन उलगडत पुढे जावा.
‘या मूलभूत तपासाच्या आवश्यकतांना पूर्णपणे डावलणारा दाभोलकर प्रकरणातला पिस्तुलाचा तपास आहे’, असे म्हणणे फारसे वावगे होणार नाही.
२. ‘कोण कुणाला फसवते ?’, हे जनतेने पुढील घटनाक्रमात शोधावे !
अ. २० ऑगस्ट २०१३ ला खून झाला आणि १ सप्टेंबर २०१३ ला त्या पुलावर स्वच्छतेचे काम करणार्या एका सफाई कामगाराने सांगितले की, दाभोलकरांच्या मागून दोन तरुण मुले पळत आली. एकाने गोळ्या झाडल्या, मग दुसर्याने गोळ्या झाडल्या. परत पळत जातांना दुसर्याने त्याच्या हातातील पिस्तूल पहिल्याकडे दिले आणि पहिल्याने दोन्ही पिस्तुले त्याच्या खांद्यावरच्या बागेमध्ये टाकली. मीनानाथ गायकवाड या रस्त्यावरून जात असलेल्या साक्षीदारानेही दोघांनी गोळ्या झाडल्याचे सांगितले. याचा अर्थ ‘दोन्ही खुन्यांनी गोळीबार केला आणि दोन पिस्तुले वापरली गेली’, असा होतो.
आ. पुणे पोलिसांच्या जोरदार तपासात त्यांनी या खुनामध्ये विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी अशा दोघांना अटक केली. पोलिसांचे असे म्हणणे होते की, २० ऑगस्ट २०१३ ला ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे या दोघांना ठाणे पोलिसांनी खंडणी मागितल्याच्या एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यांच्याकडे अवैध शस्त्र आणि काडतुसे यांचा साठा मिळाला. हा साठा ठाणे पोलिसांनी मुंबईच्या शासकीय न्यायवैद्यक संस्थेकडे पाठवला. खरे तर ही एक संपूर्णपणे वेगळी गुन्ह्याची घटना होती; परंतु पुणे पोलिसांनी दाभोलकर प्रकरणी शस्त्र मिळत नसून ‘फॉरेन्सिक लॅब’कडे ‘अन्य गुन्ह्यात येणार्या शस्त्रांचा उपयोग दाभोलकरांच्या खुनाकरता झाला होता का ?’, असा तपास करावा’, अशी विनंती केली होती. पुणे पोलिसांचे म्हणणे असे की, त्या पत्रानुसार ‘फॉरेन्सिक लॅब’ने मुंब्रा येथील खंडणीच्या गुन्ह्यात जप्त झालेली शस्त्रे पडताळली, तेव्हा त्यांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, दाभोलकरांच्या शरिरातून सापडलेली गोळी, तसेच आसपास पडलेल्या रिकाम्या पुंगळ्या त्या अवैध शस्त्रसाठ्यातील एका पिस्तुलातून झाडल्याचे उघड झाले होते. पुणे पोलिसांनी या दोघांना आधी वेगळ्या दोन गुन्ह्यांमध्ये अटक केली आणि मग शेवटी दाभोलकर खून खटल्यामध्ये अटक केली. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खुनी पिस्तुलाचा माग निघाला. पिस्तूल चालवणारे हात शोधण्यासाठी खंडेलवाल आणि नागोरी यांचा तपास क्रमप्राप्त होता.
नियती ही एक विलक्षण गोष्ट आहे. या दोघांना पुणे पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले, तेव्हा त्यांनी ‘आपल्याला २५ लाख देण्याची लालूच ‘ए.टी.एस्.’चे प्रमुख राकेश मारिया दाखवत आहेत, गुन्हा मान्य करा, तुमच्या विरोधातील पुरावे कच्चेच ठेवतो, म्हणजे तुम्ही सुटू शकाल’, असे भर न्यायालयात न्यायाधिशांसमोर सांगितले.
पत्रकारांनी हे सगळीकडे छापले. कदाचित् न्यायालयाने याची नोंद घेतली नसावी; पण लोकांपर्यंत हा विषय पोचला. आजही इंटरनेटवर आपल्याला त्याच्या बातम्या मिळतात. यात गडबड अशी होते की, ‘एकाच पिस्तुलाने सगळ्या गोळ्या झाडल्या’, असे यातून निष्पन्न होत होते. न्यायवैद्यक शास्त्राचा तपास हाही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, म्हणजेच तंत्रज्ञान १ पिस्तूल सांगत होते, तर ‘प्रत्यक्षदर्शी साक्षीदार २ पिस्तुलाचा वापर झाला’ असे सांगत होते, हा काय प्रकार होता ? हे अजून थंड झाले नाही, तोवर तपास पुणे पोलिसांकडून काढून घेऊन मे २०१४ मध्ये केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे म्हणजेच ‘सीबीआय’कडे देण्यात आला. ‘खंडेलवाल, नागोरी यांना जामीन मिळाला; कारण इतक्याच पुराव्यावर या दोघांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करता येणार नाही’, असे पुणे पोलिसांनी सत्य प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाला सांगितले. मे २०१४ ते जून २०१६ उच्च न्यायालय ‘सीबीआय’ला प्रश्न विचारत राहिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आंदोलन करत राहिले. विषय चर्चेत येत राहिला, चर्चेत ठेवण्यात आला असावा का ? असो !
इ. ‘सीबीआय’कडे तपास गेल्यानंतर जून २०१६ मध्ये डॉ. तावडे यांना अटक झाली. आरोपपत्र प्रविष्ट झाले. ज्यामध्ये सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी गोळ्या झाडल्याचे ‘सीबीआय’चे म्हणणे होते. या दोघांना फरार घोषित केले गेले. ‘सीबीआय’ने त्यांच्यावर बक्षीस लावले. दाभोलकरांच्या अनुयायांनी देशभरात या दोघांना शोधण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले. ठिकठिकाणी या दोघांची छायाचित्रे लावण्यात आली. त्यांच्या घरी चौकशीसत्र चालू राहिले, धाडी टाकण्यात आल्या. या प्रक्रियेत पिस्तुलाचे गौडबंगाल तसेच राहिले.
ई. पुन्हा झाले असे की, दाभोलकरांच्या शरिरात सापडलेली गोळी आणि मृतदेहापाशी पडलेल्या रिकाम्या पुंगळ्या, हा सगळा मुद्देमाल, तसेच पानसरे खून प्रकरणातील पानसरेंच्या शरिरातील एक गोळी अन् घटनास्थळी पडलेल्या ५ रिकाम्या पुंगळ्या, या सर्व वस्तू ‘सीबीआय’, तसेच कोल्हापूरच्या विशेष तपास पथकाने कलबुर्गी खुनाचा शोध घेणार्या कर्नाटकच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडे सुपूर्द केले. कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण शाखेने, या सर्व वस्तू आणि कलबुर्गी खून प्रकरणातील गोळ्या अन् रिकाम्या पुंगळ्या असे सगळे बेंगळुरूच्या ‘फॉरेन्सिक लॅबोरेटरी‘कडे पाठवले. या फॉरेन्सिक लॅबोरेटरीने अजूनच भन्नाट अहवाल दिला. त्यातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –
ई १. दाभोलकर खून प्रकरणातील सर्व गोळ्या आणि रिकाम्या पुंगळ्या एकाच पिस्तुलाने झाडलेल्या होत्या.
ई २. पानसरे खून प्रकरणातील काही पुंगळ्या दाभोलकर खून प्रकरणात वापरल्या गेलेल्या पिस्तुलातून झाडलेल्या होत्या, तर अन्य पुंगळ्या या एका वेगळ्या पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या होत्या आणि हेच वेगळे पिस्तूल नंतर कलबुर्गींच्या खुनात वापरण्यात आलेले होते.
उ. थोडक्यात पानसरे खून प्रकरणी दोन पिस्तुले वापरण्यात आली. त्यातील एक पिस्तूल हे आधी दाभोलकर प्रकरणात वापरण्यात आले होते, तर दुसरे हे कलबुर्गी खून प्रकरणी वापरण्यात आले आणि म्हणून पोलिसांनी असे सिद्ध करायचा प्रयत्न केला की, तीनही खून एकाच गटाने केले होते.
अशा पद्धतीने ‘पानसरे प्रकरणातील २ पिस्तुले, ज्यांतील एक आधी दाभोलकर खुनात वापरले गेले, तर दुसरे पिस्तूल नंतर कलबुर्गी खुनात वापरले’, असा अहवाल बेंगळुरूच्या ‘फॉरेन्सिक लॅबोरेटरी’ने दिला.
(महाराष्ट्रातील चर्चेचा विषय बनलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या संबंधी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित माहिती, आरोपपत्रे आणि न्यायालयाचे आदेश यांचे हे पुस्तक एक विस्तृत संशोधन आहे. या प्रकरणात दोन पक्ष आहेत. एक हत्या झालेल्या नास्तिकतावाद्यांचा आणि दुसरा हत्येचा आरोप झालेल्या संस्थांच्या सदस्यांचा. प्रस्तुत लेखकाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने लेखन न करता संपूर्ण तपासाचे तटस्थपणे सत्यशोधन केले आहे. उभय प्रकरणातील अन्वेषण यंत्रणांचे पूर्ण अपयश आणि पोलिसांच्या तपासावरील राजकीय प्रभाव यांवर हे पुस्तक भाष्य करते. खरे आरोपी न पकडले गेल्यास सीबीआयसारखी सर्वोच्च अन्वेषण संस्थाही कशा प्रकारे अन्यायकारक कृत्ये करते, हे पुस्तकातील उदाहरणांवरून लक्षात येते. या पुस्तकात लेखकाने भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात दोषींना शिक्षा देण्यासाठी आणि निरपराध्यांना संरक्षण देण्यासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेले पोलीस दले अन् न्यायिक प्रक्रिया यांच्यात सुधारणा तातडीने व्हावी, यासाठी पाठपुरावा केला आहे.)
(क्रमशः पुढच्या रविवारी)
लेखक : डॉ. अमित थढानी, प्रसिद्ध शल्यचिकित्सक, मुंबई.
(साभार : ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’, या पुस्तकातून)
हे पुस्तक ‘अमेझॉन’ च्या संकेतस्थाळावर पुढील लिंक वर विक्री साठी उपलब्ध आहे : https://amzn.eu/d/7h8m1Sx