विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी चालू असलेल्या रेल्वेगाड्या नियमित करण्याची मागणी

रत्नागिरी – दीपावली, होळी, गणपति या कालावधीत विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी ०१२३९/४० गोंदिया – करमाळी, ०१२०१/०२ बल्लारशा – मडगाव, ०१२५५/५६ चंद्रपूर – थिवीम या विशेष हंगामी रेल्वेगाड्या नियमित चालू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण – सावंतवाडी, राष्ट्रीय रेल्वे प्रवाशी संघटना शेगाव सरचिटणीस वैभव बहुतूले यांनी मध्य रेल्वेप्रशासनाकडे केली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग राजमार्ग परिवहन दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभुमी, वर्धा येथील म. गांधीजींचा सेवाग्राम आश्रम, चंद्रपूर येथील महाकाली मंदिर, शेगाव येथील भाविकांचे आराध्य दैवत श्री. गजानन महाराज तीर्थक्षेत्र, बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा (माँ जिजाऊ जन्मस्थळ), अमरावती जिल्ह्यातील संत गाडगेबाबा महाराज जन्मस्थळ मोझरी, नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती, मूर्तीजापूर कार्तिकस्वामी मंदिर दर्शनासाठी कोकणातील भाविक बुलढाणा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया परिसरात येत असतात, तसेच खान्देश आणि विदर्भातील नागरिक मोठ्या संख्येने कोकणात निसर्गरम्य परिसर पहाण्यासाठी येत असतात. त्यामुळे विशेष गाड्या या नियमितपणे चालू झाल्यास विदर्भातील प्रसिद्ध असलेली नागपुरी संत्री, हलदीराम गुलाबजाम, श्रीखंड, आम्रखंड, संत्राबर्फी, सोनपापडी, शेगावची प्रसिद्ध कचोरी याचा स्वाद कोकणवासियांना घेता येणार आहे. कोकणातील रत्नागिरीचा हापूस आंबा, सिंधुदुर्गचा देवगड हापूस आंबा, मालवणी खाजा, कडक बुंदी लाडू, सावंतवाडी जिल्ह्यातील लाकडी खेळणी, रायगडचा पांढरा कांदा, पापड, कुरडया, लोणची इ. आयात-निर्यात केल्याने विदर्भ आणि कोकणातील उद्योगांत वृद्धी व्हायला उपयुक्त ठरणार आहे. याद्वारे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार होऊन रेल्वे विभागाला महसूलही प्राप्त होईल, तरी या रेल्वेगाड्या नियमित कराव्यात, अशी मागणी आहे.