कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची षष्ठीला ‘मोहिनीरूपिणी माता’ रूपातील पूजा !

श्री महालक्ष्मीदेवीची ‘मोहिनीरूपिणी माता’ रूपातील पूजा

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची षष्ठीला ‘मोहिनीरूपिणी माता’ रूपातील पूजा बांधण्यात आली होती. देव आणि दैत्य यांनी केलेल्या समुद्र मंथनातून दुर्लभ अशी १४ रत्ने प्रकट झाली. यात धन्वन्तरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. हा अमृत कलश दैत्य बळजोरीने काढून घेऊ लागले. ‘या अमृत प्राशनाने अधार्मिक, अन्यायी, क्रूर राक्षस अमर होतील आणि सर्वांना त्रासदायक होतील’, अशी देवगणांना चिंता वाटू लागली. सर्व देव श्रीविष्णूंना शरण गेले. या वेळी भगवान विष्णूने आत्म्यैकरूपा श्री ललितादेवीची आराधना करून ध्यानयोगाने (स्वत:चे ठायी) श्री मातेचे रूप प्रकट केले. तोच मोहिनी अवतार होय.

त्रिभुवनाला मोहित करणारी, शृंगारनायिका, सर्व आभूषणांनी आणि शृंगारवेषांनी युक्त, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणारी अशी मोहिनी रूपाचे दर्शन घडवणारी ही महापूजा होय. ही पूजा श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.