पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ‘जय श्रीराम’च्या घोषणेवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे भारताविरुद्ध तक्रार !

पाकिस्ताचे हिंदु असलेले माजी खेळाडू दानिश कनेरिया यांची पाक मंडळावर टीका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात चालू आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला होता. या सामन्याच्या वेळी प्रेक्षकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या होत्या. पाकचा खेळाडू महंमद रिझवान याच्या समोरही घोषणा देण्यात आल्या. याविषयी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे तक्रार केली आहे.

तसेच पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा मिळण्यास होत असलेल्या विलंबावरूनही तक्रार केली आहे. पाक क्रिकेट मंडळाच्या या तक्रारींवरून पाकचाच हिंदु माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया याने या मंडळावर टीका केली आहे. त्याने सामाजिक माध्यमांवर एक ट्वीट करत, ‘पाकिस्तानी पत्रकार झैनाब अब्बास हिला भारत आणि हिंदु यांच्या विरोधात टिप्पणी करायला कुणी सांगितले होते ? पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मार्गदर्शक मिकी आर्थर यांना ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाची ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आहे, असे वाटते’, असे बोलायला कुणी भाग पाडले ? महंमद रिझवान याला मैदानात नमाजपठण करण्यास कुणी सांगितले ? त्यामुळे दुसर्‍यांच्या चुका शोधणे बंद करायला हवे’, असे म्हटले आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळावर टीका करतांना दानिश कनेरिया यांनी पुढे म्हटले की, मी पाकिस्तानसाठी माझे रक्त दिले आहे. त्यामुळे मला पाकिस्तान आणि येथील नागरिकांसमवेत कोणतीही अडचणी नाही. माझी तक्रार केवळ माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा गर्विष्ठपणा आणि त्याचा दुटप्पीपणा यांवर माझा आक्षेप आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानी खेळाडू मैदानात नमाजपठण करतात, ते पाक क्रिकेट मंडळाला कसे चालते ?