नवे पारगाव, वारणानगर, कोल्हापूर येथील सनातनच्या १०९ व्या (समष्टी) संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांचा आज आश्विन शुक्ल चतुर्थी (१८.१०.२०२३) या दिवशी ८१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आलेली अनुभूती येथे देत आहोत.
पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सकाळी प्रसाधनगृहात गेल्यावर चक्कर येऊन पडणे, देवाच्या कृपेने कुटुंबियांनी प्रसाधनगृहाचे दार उघडून बाहेर काढणे
‘१०.७.२०२३ या दिवशी मी नेहमीप्रमाणे पहाटे ५.१५ वाजता उठले. वैयक्तिक आवरून मी ६ ते ७ या वेळेत नामजप केला. नंतर व्यायाम करून प्रसाधनगृहात गेले. मी हात धूत असतांना ‘थोडी चक्कर येत आहे’, असे मला वाटले आणि त्याच क्षणी मी खाली पडले. मी उठण्याचा प्रयत्न केला; पण बरेच प्रयत्न करूनही मला उठता येत नव्हते. मी देवाचे नाव घेऊन प्रसाधनगृहाचे दार जोराने वाजवले आणि मुलीला सांगितले, ‘‘मी दाराला आतून कडी घातली आहे. मी पडले असून मला उठता येत नाही.’’ देवाच्या कृपेने माझी मुलगी आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि नातू आधुनिक वैद्य कौशल कोठावळे दोघेही घरी होते. त्यांनी थोडा प्रयत्न करून दार उघडून मला बाहेर घेतले.
२. डोळ्याजवळ लागल्यामुळे तिथे टाके घालावे लागणे; मात्र गुरुकृपेने ‘सिटी स्कॅन’चा अहवाल सामान्य येणे
त्यानंतर मुलीने आधुनिक वैद्यांना बोलावले. केवळ आणि केवळ प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला कुठे काही लागले नव्हते. केवळ डोळ्याच्या बाजूला थोडे लागले होते आणि तिथून रक्त येत होते. त्यामुळे तिथे टाके घालायला लागले. नंतर ‘सिटी स्कॅन’ (टीप) केल्यावर त्याचा अहवाल सामान्य (नॉर्मल) आला.
टीप : ‘सी.टी.स्कॅन’ (Computed tomography) हेे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांचे छायाचित्र काढण्याचे तंत्रज्ञान आहे.
३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करणे
याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना कळवल्यावर त्यांनी मला ‘महाशून्य’ हा नामजप ३ घंटे करायला सांगितला. मी सतत ४ दिवस हा नामजप केला. या सर्व कालावधीत मी केवळ २ दिवसच विश्रांती घेतली.
४. सद्गुरु स्वाती खाडये यांनी दिलेला आधार !
सद्गुरु स्वाती खाडये यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘काही काळजी करू नका.’’ मला त्यांचा मोठा आधार वाटतो.
५. गुरुस्मरण अखंड होणे
या प्रसंगाच्या वेळी माझ्या मनात गुरुदेवांचे स्मरण अखंड होत होते. मी गुरुकृपा अनुभवत होते. केवळ प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अपार कृपेमुळे फारसा त्रास न होता मी लगेच बरी झाले.
यासाठी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– (पू.) डॉ. श्रीमती शरदिनी कोरे, नवे पारगाव, वारणानगर, कोल्हापूर. (२८.७.२०२३)