सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला होणाऱ्या विलंबाविषयी अप्रसन्नता व्यक्त केल्याने अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया
मुंबई – ज्यांचा राज्यघटनेवर विश्वास असतो, त्यांनी राज्यघटनेने स्थापन केलेल्या विविध संस्थांचा मान राखणे आवश्यक आहे. मी राज्यघटनेला मानत असल्याने न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवीन. विधीमंडळाचे सार्वभौमत्व कायम ठेवणे, हे माझे कर्तव्य आहे, असे विधान विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले. शिवसेनेच्या आमदरांच्या पात्रतेविषयी सर्वाेच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी सर्वाेच्च न्यायालयाने अध्यक्षांकडून सुनावणीला होणार्या विलंबाविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. त्याविषयी नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत सुनावल्यानंतर आपण न्यायालयाच्या निर्देशांनुसार काम करू अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.https://t.co/s3LFfOLyew
— Saamana (@SaamanaOnline) October 16, 2023
या वेळी अधिवक्ता राहुल नार्वेकर म्हणाले, ‘‘विधीमंडळातील पीठासीन अधिकार्यांचाही आदर राखणेही तेवढेच आवश्यक आहे. राज्यघटनेला मानणारे नागरिक म्हणून आम्ही न्यायालयाच्या प्रत्येक प्रक्रियेचे आणि निर्णयाचे पालन करू. मी सगळ्या न्यायालयांचा मान राखतो आणि सगळ्या न्यायालयाच्या आदेशांचे पालन करतो. केवळ आरोप केल्यामुळे एखादी बाजू सत्य नसते. आरोपांकडे दुर्लक्ष करून आपले काम कायदेशीररीरित्या करत रहाणे अपेक्षित आहे. मी तसेच करणार आहे.’’