गोवा : अमली पदार्थ प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकाला सशर्त जामीन संमत

प्रयोगशाळेचा रासायनिक अहवाल ३ वर्षे प्रलंबित असल्याने न्यायालयाने दिला निर्णय

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, १५ ऑक्टोबर (वार्ता.) : म्हापसा येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बॉस्को जी.एफ्. रॉबर्ट यांनी वर्ष २०१९ मध्ये अमली पदार्थ समवेत बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतलेला चिनेडू मंडे न्वाफेर या नायजेरियाच्या नागरिकाला सशर्त जामीन संमत केला आहे. वेर्णा येथील गोवा राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा रासायनिक अहवाल ३ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असल्याने विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. (याची चौकशी करून रासायनिक अहवालाला झालेल्या विलंबाविषयी संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

कळंगुट पोलिसांनी ८ डिसेंबर २०१९ या दिवशी नायजेरियाचा नागरिक चिनेडू मंडे न्वाफेर याच्याकडून १ लाख ८५ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण पूर्ण करून संशयिताच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले होते. या काळात संशयित चिनेडू मंडे न्वाफेर याने न्यायालयात ३ वेळा जामिनासाठी अर्ज केले. न्यायालयाने हे सर्व अर्ज फेटाळून लावले. यानंतर चिनेडू मंडे न्वाफेर यांनी न्यायालयात चौथ्यांदा जामिनासाठी अर्ज केला. यामध्ये चिनेडू मंडे न्वाफेर म्हणाला, ‘‘पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या रासायनिक विश्लेषकांचा चाचणी अहवाल नसतांना न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे आणि यामुळे हे आरोपपत्र अपूर्ण आहे. यासाठी माझी जामिनावर सुटका करावी.’’ या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू असतांना पोलिसांनी धाडीच्या वेळी अमली पदार्थ शोधण्याच्या उपकरणांच्या (‘ड्रग्ज डिटेक्शन किट्स’च्या) आधारे संशयिताने अमली पदार्थ समवेत बाळगले होते, असे चाचणीत उघडकीस आल्याचे न्यायालयाला सांगितले. वेर्णा येथील गोवा राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या रासायनिक विश्लेषक चाचणीची पोलीस प्रतीक्षा करत असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. यानंतर न्यायालयाने संशयित चिनेडू मंडे न्वाफेर याला २५ सहस्र रुपये आणि इतर अटी यांवर सशर्त जामीन संमत केला.

म्हापसा येथे गांजा बाळगल्याच्या प्रकरणी एकाला अटक

म्हापसा : म्हापसा पोलिसांनी गोविंद जाधव (वय २६ वर्षे) याला १५ ऑक्टोबर या दिवशी अर्धा किलो गांजा समवेत बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले. संशयित म्हापसा येथील सेंट जीरोम चर्च येथील वाहनतळाच्या जागेत ग्राहकाच्या शोधात असतांना पोलिसांनी ही कारवाई केली.

संपादकीय भूमिका

  • अमली पदार्थांची प्रकरणे वाढत असतांना असा हलगर्जीपणा अपेक्षित नाही. अशाने अमली पदार्थ व्यावसायिकांना दिलासाच मिळणार !
  • रासायनिक अहवालाला होणार्‍या विलंबाची समस्या तात्काळ सोडवणे आवश्यक आहे !