इस्रायलचा आदेश मान्य नसल्याचे सांगत तुर्कीयेचा थयथयाट !

२४ घंट्यांत गाझा रिकामा करण्याचा इस्रायलने आदेश दिल्याचे प्रकरण

लोक उत्तर गाझा सोडून जाताना

तेल अविव (इस्रायल) – पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने १५ ऑक्टोबर या दिवशी दावा केला की, इस्रायलच्या हवाई आक्रमणात गाझा पट्टीमधील ७० लोक मारले गेले, तर अनुमाने २०० लोक घायाळ झाले. इस्रायलने दिलेल्या संकेतानंतर हे सर्व लोक उत्तर गाझा सोडून जात होते, असेही पॅलेस्टाईनचे म्हणणे आहे. पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक भागात इस्रायली सैन्याच्या कारवाईत ११ जण ठार झाल्याची माहिती आहे. ‘२४ घंट्यांत गाझा रिकामा करणे अशक्य असून इस्रायलचा हा आदेश मान्य करता येणार नाही. जगातील सर्व देशांनी यासंदर्भात आवाज उठवला पाहिजे. उत्तर गाझामधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा’, असे तुर्कीये सरकारने म्हटले आहे.

दुसरीकडे ‘इस्रायली सैन्याने गाझावरील कारवाईच्या वेळी फॉस्फरस बाँबचा वापर केला’, असा दावा करणार्‍या वृत्तांचे खंडण केले. इस्रायली सैन्य म्हणाले की, हे निराधार वृत्त असून इस्रायलविरोधी प्रचार केला जात आहे. या सर्वांत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन १३ ऑक्टोबर या दिवशी कतारला पोचले. ते म्हणाले, ‘‘कतारने हमासवर दबाव आणून ओलिसांची सुटका करावी. गाझा पट्टीमधील सैनिकी कारवाईच्या वेळी सामान्य लोकांची हानी होऊ नये, यासाठी इस्रायल सरकार प्रयत्न करत आहे.’’

संपादकीय भूमिका

  • हमासच्या आतंकवाद्यांनी ज्या निष्पाप इस्रायली नागरिकांची हत्या केली, त्यावर तुर्कीये चकार शब्दही बोलत नाही, हे लक्षात घ्या !
  • काश्मीरमध्ये फोफावत असलेल्या पाकपुरस्कृत जिहादचे नेहमीच समर्थन करणार्‍या तुर्कीयेकडून अजून कोणती अपेक्षा करणार ?