पूर्वजांची अवहेलना नको !

सध्‍या पितृपक्ष चालू आहे. याच अनुषंगाने सामाजिक माध्‍यमांवर एक छायाचित्र प्रसारित झाले. त्‍यात ‘स्‍मार्ट’ भ्रमणभाष येण्‍याच्‍या आधी सर्वजण वापरत असलेल्‍या भ्रमणभाष संचांची छायाचित्रे आहेत. त्‍याखाली लिहिले आहे, ‘हे आहेत आपल्‍या आताच्‍या ‘स्‍मार्ट मोबाईल’चे पूर्वज ! सध्‍या पितृपक्ष चालू असल्‍याने आठवण करून दिली.’ हा विनोद असल्‍याप्रमाणे अनेकांनी त्‍याला ‘लाईक’ (आवडले) करत दुसर्‍यांना पाठवले आहे. हा निश्‍चितच विनोद नव्‍हे ! ही हिंदु धर्माची केलेली टिंगलटवाळी आहे. एका हिंदु महिलेनेच हे छायाचित्र प्रसारित केलेले आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्‍याचाच हा परिणाम आहे, दुसरे काय ? अन्‍य धर्मीय आपापल्‍या धर्मातील चालीरिती, प्रथा-परंपरा यांची अशा प्रकारे कधीच खिल्ली उडवत नाहीत. जे धर्मात सांगितले आहे, त्‍यानुसार काटेकोरपणे आचरण करण्‍याचा त्‍यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्‍यामुळे त्‍यांच्‍या धर्मातील गोष्‍टींविषयी असे प्रकार सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाल्‍याचे कधीच दिसत नाही. प्रत्‍येक वेळी दिसून येतो, तो त्‍यांचा धर्माभिमान !

खेदाची गोष्‍ट म्‍हणजे केवळ हिंदूंच्‍या संदर्भातच असे आहे. आधीच्‍या काळातील भ्रमणभाष संचांना ‘पूर्वज’ म्‍हणणे, हे अतिशय चुकीचे आहे. खरेतर भ्रमणभाषसारख्‍या निर्जीव वस्‍तूच्‍या संदर्भात असा शब्‍दप्रयोग करणे, म्‍हणजे ‘उचलली जीभ लावली टाळ्‍याला’, असाच प्रकार होय. काळानुसार बर्‍याच गोष्‍टी पालटत असतात. त्‍यामुळे त्‍यांना अशा प्रकारे पूर्वज संबोधू शकत नाही. पूर्वज म्‍हणजे काय ? श्राद्धाच्‍या कालावधीत त्‍यांचा आणि आपला काय संबंध असतो ? त्‍यांना मुक्‍ती देण्‍याच्‍या संदर्भातील आपले कर्तव्‍य काय ? अशा दृष्‍टीने ना कुणी हिंदु अभ्‍यास करतो, ना त्‍याविषयी जिज्ञासेने जाणून घेतो ! अशा हिंदूंकडून पितृपक्ष, श्राद्धविधी, पितरांना पान दाखवणे या सर्वांना खोटे ठरवण्‍याचे पातक घडत असते; पण त्‍यांच्‍या ते लक्षातही येत नाही. काही जण तर ‘श्राद्धविधींमुळे काहीही होत नाही’, असे सांगून श्राद्ध करण्‍याचे टाळतात. श्राद्धविधीचा स्‍वयंपाक वेगळा असतो; पण ‘आमच्‍या पितरांना अमुक अमुक गोष्‍ट आवडायची’, असे सांगून शास्‍त्रात सांगितल्‍याप्रमाणे नव्‍हे, तर स्‍वतःच्‍या मनाप्रमाणे मांसाहार किंवा ‘फास्‍ट फूड’ असे पदार्थही श्राद्धविधींच्‍या वेळी ठेवतात. व्‍यवहारात आपण जाणकारांचे मत घेऊन त्‍यानुसार अवलंब करत असतो; मग जेव्‍हा धर्माचरणाची वेळ येते, तेव्‍हाच मनमानी का केली जाते ? याचा विचार व्‍हायला हवा. हिंदूंनी धर्मातील संकल्‍पनांचा अनादर करणे टाळावे एवढेच !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.