अनेक तीव्र शारीरिक त्रासांवर गुरुकृपेने मात करत साधना करणारे छत्रपती संभाजीनगर येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. मधुकर दत्तात्रेय देशमुख (वय ७७ वर्षे) !

श्री. मधुकर दत्तात्रेय देशमुख

१. आई ११ मासांची गर्भवती असूनही बाळंतीण न होणे, गावाची वेस ओलांडून माहेरी गेल्‍यावर बाळंतीण होणे

‘माझ्‍या जीवनात अनेक कठीण प्रसंग घडले; परंतु प.पू. गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने मी त्‍यातून वाचलो. प.पू. गुरुदेव माझ्‍या जीवनात नसते, तर माझा जन्‍मच झाला नसता. माझ्‍या वेळी आई गर्भवती असतांना चुलतीने तिचा गर्भ बांधून टाकला होता. ती ११ मासांची गर्भवती असूनही बाळंतीण झाली नाही. त्‍यामुळे सर्व जण काळजीत होते. तेव्‍हा कुणीतरी कुटुंबियांना सांगितले, ‘‘गावाची शीव (वेस) ओलांडल्‍याविना ती बाळंतीण होणार नाही.’’ त्‍यामुळे तिला माहेरी पाठवण्‍यात आले. त्‍यानंतर माझा जन्‍म झाला.

२. जन्‍माला आल्‍यापासून अनेक गंभीर व्‍याधी होणे, पुष्‍कळ त्रास होत असल्‍यामुळे एकदा झोपेच्‍या गोळ्‍या अधिक प्रमाणात घेणे, तरीही गुरुकृपेने जिवंत रहाणे

जन्‍मापासूनच मला बाळदमा (लहान मुलांना होणारा दमा) चालू झाला. अनुमाने मी १४ वर्षांचा होईपर्यंत प्रत्‍येक मासाला मला ताप, खोकला आणि उलट्या होत असत. मला पुष्‍कळ त्रास सहन करावा लागला. नंतर १५ व्‍या वर्षांपासून आव आणि रक्‍ताची हगवण चालू होऊन पोटदुखीचा त्रास चालू झाला. मला इतका भयंकर त्रास होत होता की, पाण्‍याबाहेर मासा तडफडतो, त्‍याप्रमाणे मी तडफडत असायचो. माझ्‍या वडिलांनी माझ्‍याकडे लक्ष न दिल्‍यामुळे पोटदुखीच्‍या विकारांमुळे मला ‘अल्‍सर’ (पचनमार्गाच्‍या आवरणावर होणारे व्रण) झाला. त्‍यामुळे मला पुष्‍कळ त्रास होत होता; म्‍हणून एके दिवशी मी झोपेच्‍या ५ – ६ गोळ्‍या घेऊन रात्री झोपलो, तरी मी सकाळी उठलो. त्‍या गोळ्‍यांचा माझ्‍यावर काहीच परिणाम झाला नव्‍हता. गुरुकृपेने मी जिवंत राहिलो.

३. शिक्षण

पोटदुखीचा तीव्र त्रास असतांनाही मी पोटाशी उशी धरून पाठांतर करून गुरुदेवांच्‍या कृपेने दहावी उत्तीर्ण झालो. ‘मी दहावी उत्तीर्ण होईन’, असे माझ्‍या नातलगांना वाटत नव्‍हते. अशा स्‍थितीतच मी पाठांतर करून यवतमाळ येथे पुढचे शिक्षण घेतले. वर्ष १९६९ मध्‍ये दम्‍याचा झटका (अटॅक) येऊन माझ्‍या आईचे निधन झाले. तेव्‍हा माझी नेमकी ‘बी.कॉम.’च्‍या शेवटच्‍या वर्षाची परीक्षा चालू होती. त्‍यामुळे माझा एक विषय राहिला. नंतर पुरवणी परीक्षेत वाणिज्‍य विषयात मी कसाबसा तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालो.

४. गुरुकृपेने नोकरी मिळणे आणि उदरनिर्वाह चालणे

पदवी घेतल्‍यावर मला २ वर्षे नोकरी लागली नाही. त्‍यामुळे मी घरीच होतो. वर्ष १९७१ मध्‍ये माझ्‍या ओळखीचे श्री. पांडे यांनी मला यवतमाळ येथे बोलावून घेऊन यवतमाळ जिल्‍हा परिषदेत ‘लिपिक’ म्‍हणून नोकरी लावून दिली. ही माझ्‍यावर झालेली अपार गुरुकृपाच होती. केवळ गुरुदेवांच्‍या कृपेनेच माझा उदरनिर्वाह चालू आहे; अन्‍यथा मला जीवन जगणे कठीण झाले असते.

५. विवाह होणे आणि पोटाचे शस्‍त्रकर्म झाल्‍यावर गुरुकृपेने पोटाचा त्रास उणावणे

वर्ष १९७३ मध्‍ये माझा विवाह झाला. माझा पोटदुखीचा त्रास चालूच होता. वर्ष १९७९ मध्‍ये मी ‘अल्‍सर’चे शस्‍त्रकर्म करून घेतले. तेव्‍हापासून गुरुदेवांच्‍या कृपेने माझा पोटाचा त्रास न्‍यून झाला. ही मोठीच गुरुकृपा मला अनुभवता आली. त्‍यासाठी कृतज्ञता व्‍यक्‍त करायला माझ्‍याकडे शब्‍दच नाहीत.

६. गुरुकृपेने ‘होमिओपॅथी’ शिकल्‍यामुळे प्रपंच सांभाळणे शक्‍य होणे

माझ्‍या शस्‍त्रकर्माच्‍या वेळी मी ‘होमिओपॅथी’ची औषधे घेऊन लवकर बरा झालो. गुरुदेवांच्‍या कृपेने मी ‘होमिओपॅथी’ शिकलो. त्‍यामुळे मी घरातील एकूण ६ जणांना सांभाळू शकत आहे. नाहीतर तुटपुंज्‍या पगारात एवढा व्‍याप सांभाळतांना मला अशक्‍य झाले असते. गुरुदेवांनी प्रत्‍येक गोष्‍टीत माझी काळजी घेतली. आताही प.पू. गुरुदेव माझ्‍या मनात आलेला प्रत्‍येक विचार पूर्ण करतात. गुरुदेवांनी आमच्‍यासाठी यापेक्षा अजून काय करावे ? कृतज्ञता गुरुदेव !

७. गुरुकृपेने ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी होऊन दोघेही (पती-पत्नी) जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त होणे

डिसेंबर १९९७ मध्‍ये परात्‍पर गुरु कालीदास देशपांडे यांच्‍या माध्‍यमातून आम्‍हा दोघांचा (मी आणि पत्नी सौ. शोभा (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७२ वर्षे) सनातन संस्‍थेशी परिचय होऊन आमची साधना चालू झाली. त्‍यांचे पहिले प्रवचन ऐकल्‍यानंतर ‘आपल्‍याला पाहिजे, तेच मिळाले’, असे वाटून आम्‍हाला पुष्‍कळ आनंद झाला. वर्ष २००१ मध्‍ये मी पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी स्‍वेच्‍छानिवृत्ती घेतली. तेव्‍हा माझी २९ वर्षे नोकरी झाली होती. प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने आम्‍हा दोघांकडून व्‍यष्‍टी साधना आणि समष्‍टी सेवा पुष्‍कळ झाली. २९.४.२०१९ या दिवशी प.पू. गुरुदेवांनी आम्‍हा दोघांची ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी घोषित करून आम्‍हा दोघांनाही एकत्रच जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त केले.

जय गुरुदेव ! जय गुरुदेव ! कृतज्ञता गुरुदेव !’

– श्री. मधुकर देशमुख (वय ७७ वर्षे), छत्रपती संभाजीनगर.