छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘देव, धर्म आणि देश’ रक्षणाचा आदर्श घेऊन नवा भारत बनवूया ! – डॉ. प्रमोद सावंत

‘शिवशौर्य’ यात्रेची म्हापसा येथे सांगता

पणजी, ९ ऑक्टोबर (वार्ता.) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘देव, धर्म आणि देश’ यांच्या रक्षणासाठी कार्य केले. याच धर्तीवर आताच्या युवकांनी नवीन भारत बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी १ ते ८ ऑक्टोबर या काळात राज्यभर ‘शिवशौर्य’ यात्रेचे आयोजन केले होते. विश्व हिंदु परिषदेच्या कार्याला ६० वर्षे पूर्ण झाली, तसेच शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘शिवशौर्य’ यात्रेचे राज्यात आयोजन करण्यात आले होते. यात्रेची सांगता म्हापसा येथील टॅक्सी स्टँडवर ८ ऑक्टोबरला सायंकाळी उशिरा एका जाहीर सभेद्वारे झाली. या सभेला सरकारमधील विविध मंत्रीगण, अखिल भारतीय बजरंग दलाचे राष्ट्रीय समन्वयक नीरज दनोरीया आदींची उपस्थिती होती. जाहीर सभेच्या प्रारंभी यात्रेची म्हापसा शहारातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज गोव्यात आले आणि त्यांनी आमचे रक्षण केले. यासाठी आम्ही भाग्यवान आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पोर्तुगिजांची जुलमी राजवट आणि धर्मांतर यांपासून आमचे रक्षण केले. मंदिरांच्या होत असलेल्या विध्वंसाला आळा घातला.’’

सनातन धर्म कुणीही नष्ट करू शकणार नाही !

सध्या सनातन धर्मावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होत आहे. काहींनी या कृतीतून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. सनातन धर्म कुणीही कधीही संपवू शकणार नाही आणि कुणी त्यासाठी प्रयत्नही करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन भारत सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अयोध्या येथे भव्य श्रीराममंदिर उभारले जात आहे, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

 (सौजन्य : Prasanna’s Vlogs and Adventures)

सेवा आणि शिक्षण यांच्या आडून होत आहे धर्मांतर ! – नीरज दनोरीया

अलीकडे इस्लामी जिहाद आणि वामपंथी देशद्रोही कारवाया करत आहेत. सेवा आणि शिक्षण यांच्या आडून धर्मांतर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा पुढे नेऊन हिंदुत्व अखंड ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

हिंदु संस्कृती आणि मूल्ये यांनुसार आपले आचरण ठेवावे, असे आवाहन अखिल भारतीय बजरंग दलाचे राष्ट्रीय समन्वयक नीरज दनोरीया यांनी या वेळी केले.