इस्रायलच्या ३००, तर पॅलेस्टाईनच्या ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध

तेल अविव (इस्रायल) – पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना ‘हमास’ने केलेल्या आक्रमणात इस्रायलच्या ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर १ सहस्र ८६४ जण घायाळ झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये गाझा सीमेवर इस्रायलच्या संरक्षण दलाचा कमांडर नहल ब्रिगेड याचा समावेश आहे.

दुसरीकडे इस्रायलने प्रत्युत्तरादाखल पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीवर केलेल्या हवाई आक्रमणात ४०० हून अधिक नागरिक ठार झाले, तर १ सहस्र ७०० हून जण घायाळ झालेआहेत. हमासने दावा केला होता की, त्याने अनेक इस्रायलींना ओलीस ठेवले होते. बीबीसीच्या वृत्तानुसार या ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. सौदी अरेबियाने इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांना आक्रमणे थांबवण्याचे आवाहन केले आहे.

इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीचे हार्डवेअर १२ वर्षांपासून अद्यायावतच केले नाही !

हवाई आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी इस्रायलने वर्ष २०११ मध्ये ‘आयर्न डोम’ नावाची हवाई संरक्षण यंत्रणा सिद्ध केली होती. त्यानंतर जगातील सर्वांत विश्‍वासार्ह हवाई संरक्षण प्रणाली म्हणून तिचे वर्णन केले गेले. १० मे २०२३ या दिवशी जेव्हा हमासने इस्रायलच्या दक्षिण भागात क्षेपणास्त्रे डागली, तेव्हा ती क्षेपणास्त्रे अयशस्वी झाली.

त्या आक्रमणानंतर केलेल्या अन्वेषणात असे दिसून आले की, त्याचे हार्डवेअर वर्ष २०११ पासून अद्ययावत करण्यात आले नव्हते; मात्र सॉफ्टवेअर वारंवार अद्ययावत केले जात होते. आक्रमणाच्या वेळी हार्डवेअर त्याच्या सॉफ्टवेअरशी संपर्क करण्यास सक्षम नव्हते.  ब्रॉक युनिव्हर्सिटीचे साहाय्यक प्राध्यापक मायकेल आर्मस्ट्राँग यांनी सांगितले की, कुठलीही क्षेपणास्त्र प्रणाली पूर्णपणे विश्‍वसनीय नसते. आता आक्रमणाचे स्वरूप पालटत आहे.