‘इस्रो’च्या ‘सॉफ्टवेअर’वर प्रतिदिन १०० हून अधिक सायबर आक्रमणे होतात !

इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ यांनी दिली माहिती !

कोची (केरळ) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’च्या) सॉफ्टवेअरवर प्रतिदिन १०० हून अधिक सायबर आक्रमणे होतात, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस्. सोमनाथ यांनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सायबर परिषदेत दिली.

आमची सायबर सुरक्षा सुसज्ज !


सोमनाथ पुढे म्हणाले की, रॉकेट तंत्रज्ञानामध्ये सायबर आक्रमण होण्याची शक्यता पुष्कळ अधिक आहे; कारण त्यात प्रगत सॉफ्टवेअर आणि चिप्स यांचा वापर केला जातो. हा धोका कितीही मोठा असला, तरी अशा आक्रमणांपासून इस्रो पूर्णपणे सुरक्षित आहे. आमची प्रणाली सायबर सुरक्षेने सुसज्ज आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे आक्रमण करता येणार नाही. असे अनेक उपग्रह आहेत, जे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात साहाय्य करतात.

हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जातात. या सर्वांचे संरक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’सारख्या) तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांचा सामना करू शकतो. यासाठी अधिक चांगले संशोधन आणि कठोर परिश्रम घ्यावे लागतील.