पाकिस्तानात गेल्या ८ वर्षांत आतंकवादी आक्रमणात ४०० सैनिक आणि पोलीस ठार

अफगाणिस्तानमध्ये तालिबाची सत्ता आल्याने आतंकवादी आक्रमणात ५० टक्क्यांनी वाढ !

पाकिस्तानमध्ये आतंकवादी संघटना शक्तीशाली झाल्या

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकींमध्ये गेल्या ८ वर्षांत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यांत ४०० हून अधिक सैनिक आणि पोलीस यांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात गेल्या आठवड्यात आतंकवाद्यांनी केलेल्या स्फोटात ६० जणांचा मृत्यू झाला. वर्ष २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य निघून गेल्यानंतर आणि तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतली. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये आतंकवादी संघटना शक्तीशाली झाल्या.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. या संघटनेचा प्रमुख मुफ्ती नूर मेबसूद हा आहे. त्याने अल् कायदा, शियाविरोधी लोक आणि अनेक पाकिस्तानी आतंकवादी यांचा संघटनेत समावेश केला आहे.

टीटीपी मोठ्या प्रमाणावर आक्रमणे करून पाकिस्तानी सुरक्षादलांना लक्ष्य करत आहे.  टीटीपीला पाक सीमेवरील भागात शरीयत कायदा हवा आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर पाकिस्तानात आतंकवाद्यांची घुसखोरी चालू झाली. तालिबान सत्तेवर आल्यानंतर एका वर्षात पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणे ५० टक्क्यांनी वाढली आहेत.