गोवा खंडपिठाच्या आदेशानंतर ढवळी परिसरातील ७ भंगारअड्डे जमीनदोस्त !

२० वर्षांपासून भंगारअड्डे अनधिकृतपणे होते कार्यरत !

अनधिकृत भंगारअड्डे !

फोंडा, ५ ऑक्टोबर (वार्ता.) : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या आदेशानंतर ५ ऑक्टोबरला कवळे पंचायतक्षेत्रातील ढवळी भागातील ७ भंगारअड्डे जमीनदोस्त करण्यात आले. सुमारे २० वर्षांपासून हे भंगारअड्डे अनधिकृतपणे कार्यरत होते. मे मासात एका भंगारअड्ड्याला भीषण आग लागल्यानंतर नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा भंगारअड्ड्यांच्या विरोधात सक्रीय झाल्या होत्या. शासनाच्या कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१७ पासून भंगारड्ड्यांच्या विरोधात तक्रारी केल्या जात होत्या. (५ वर्षे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई व्हावी ! – संपादक) कवळे पंचायतीच्या ग्रामसभांमध्येही या विरोधात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. वाढत्या तक्रारीनंतर कवळे पंचायतीने अनधिकृत भंगार अड्डे पाडण्यासंबंधी आदेश काढला होता; मात्र याला भूमीच्या मालकाने प्रथम कनिष्ठ न्यायालयामध्ये नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान दिले होते. गोवा खंडपिठाने अनधिकृत भंगारअड्डे हटवण्याचा आदेश दिल्यानंतर शासनाने ही कारवाई केली. कारवाईच्या वेळी कवळे पंचायतीच्या सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर, गटविकास अधिकारी अश्विन देसाई आदींची उपस्थिती होती. प्राप्त माहितीनुसार, ढवळी परिसरात अजूनही अनेक भंगारअड्डे अनधिकृतपणे कार्यरत आहेत. (अनधिकृत भंगारअड्डे शोधून प्रशासनाने त्यांच्यावरही लवकरात लवकर कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक)

(सौजन्य : prime media goa)

संपादकीय भूमिका

भंगारअड्डे २० वर्षांपासून अनधिकृतपणे चालवले जाणे प्रशासनाला लज्जास्पद !