‘ऑनलाईन’ जुगाराच्‍या विळख्‍यात फसत आहेत तरुण !

पालघर जिल्‍ह्यातील जव्‍हार तालुक्‍यातील शहर तथा ग्रामीण भागात नवनवीन ‘फॅशन ट्रेंड’ दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असल्‍याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्‍याचे युग हे तंत्रज्ञानाचे असून तरुण पिढी भ्रमणभाषच्‍या इतकी आहारी गेली आहे की, या तरुणांना त्‍याचे एक प्रकारे व्‍यसनच जडले आहे. आज प्रत्‍येक तरुणाकडे ‘स्‍मार्टफोन’ आहे. त्‍यामध्‍ये इंटरनेटवर चालणारे अनेक प्रकारचे ‘ऑनलाईन’ खेळ (गेम) असतात. या खेळांनी तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे. ‘ऑनलाईन’ रमी, सुडुको, तीनपत्ती (पत्त्यांचा एक प्रकार), क्रिकेट सामन्‍यांसाठी ‘ऑनलाईन’ संघ सिद्ध करणे, ‘कॅण्‍डी क्रश’, ‘ब्‍ल्‍यू व्‍हेल’, ‘अँग्री बर्ड’, ‘पोकेमॉन’, ‘पब्‍जी’ असे खेळ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

आजच्‍या आधुनिक युगात सध्‍या भ्रमणभाष हा प्रत्‍येकाच्‍या जीवनाचा एक भाग बनला आहे, त्‍यात भ्रमणभाष आस्‍थापनांनीही प्रतिदिन १.५ ते २ ‘जीबी डेटा’चे प्रलोभन दाखवत तरुणांना भुरळ घातल्‍याचे पहावयास मिळत आहे. क्रिकेटसाठी मोठ्या प्रमाणात निधी असल्‍यामुळे त्‍यातून घरबसल्‍या पैसा कमावता येऊ शकतो, हे सगळ्‍यांना आकर्षित करत असल्‍याचे जाणवत आहे. त्‍यासह तीनपत्ती, रम्‍मी, लुडो यांची विज्ञापने अभिनेते, क्रिकेटपटू करत असल्‍यामुळे तरुण अधिक प्रमाणात त्‍याला फसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी ४ तरुण एकत्र येत ‘स्‍मार्टफोन’वर ‘लुडो’ खेळतांना दिसत आहेत. भ्रमणभाषच्‍या एका क्‍लिकवर आणि सोंगट्या फिरवून हे तरुण तासन् तास खेळाच्‍या सुखात मग्‍न होतांनाचे चित्र दिसत आहे.

१. ‘खेळांमधून पैसा कमावता येतो’, या अपसमजामुळे तरुणांना ‘ऑनलाईन’ खेळांचे मोठ्या प्रमाणात वेड !

केवळ तरुणच नव्‍हे, तर आजी, आजोबा, नातवंडे, आई आणि बाबा यांच्‍यातही ‘लुडो’ खेळाचा डाव चांगलाच रंगू लागला आहे. स्‍मार्टफोनमध्‍ये असलेल्‍या ‘लुडो’ या खेळाचे खूळ सध्‍या शहरासह गावखेड्यात वार्‍यासारखे पसरले आहे. पूर्वी लहान मुलांच्‍या मनोरंजनासाठी खेळ खेळला जायचा; मात्र तरुणांमध्‍येही त्‍याची ‘क्रेझ’ (वेड) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सापशिडीच्‍या मागच्‍या बाजूला लुडोचा पट असायचा. सापशिडीच्‍याच सोंगट्या वापरून तो खेळ खेळता येत होता; पण सध्‍या या खेळात घरबसल्‍या पैसा कमावता येतो, त्‍यामुळे तरुणांना या खेळाचे मोठ्या प्रमाणात वेड लागले आहे. गेल्‍या वर्षी ‘पोकेमॉन’ या खेळाने असेच वेड लावले होते. २-३ मास हा खेळ अग्रमानांकनामध्‍ये होता. तहान-भूक विसरून तरुण ‘पोकेमॉन’च्‍या शोधात वणवण भटकत होते. लुडो हा खेळ भटकण्‍याचा नसला, तरी त्‍याने तरुणांना तहानभूक विसरायला लावली आहे.

२. ‘ऑनलाईन’ जुगारावर बंदी नसल्‍याने सहस्रो कोटी रुपयांची उलाढाल !

भ्रमणभाषचा शोध लागण्‍यापूर्वीही समाजात जुगार अस्‍तित्‍वात होता; मात्र जुगार खेळणे, लॉटरी या गोष्‍टी सहज होत नव्‍हत्‍या. विविध भ्रमणभाषमधील विविध ‘अ‍ॅप’च्‍या माध्‍यमातून जुगार खेळणे अधिक सोपे झाले आहे. ‘खेलो और जीतो’, ‘खेलो और पाओ’ किंवा ‘खेळा आणि भरपूर जिंका’, अशा मथळ्‍याखाली मोठमोठी विज्ञापने भ्रमणभाष, टीव्‍ही यांसह अनेक वृत्तपत्रांत सातत्‍याने झळकत असतात. ऑनलाईन जुगाराविषयी सरकारचे धोरणच नाही, त्‍यामुळे तो फोफावत आहे. भ्रमणभाषवर सहज उपलब्‍ध आणि सोप्‍या पद्धतीने खेळल्‍या जाणार्‍या या खेळात प्रतिदिन शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. सध्‍या वर्षाला सरासरी २० सहस्र कोटी रुपयांची उलाढाल होत असून तरुण मंडळी यात मोठ्या प्रमाणात गुंतली आहे.

३. ‘ऑनलाईन गेमिंग’वर कर (टॅक्‍स) लावल्‍याने समाजासह देशाला लाभ होणार का ?

महाराष्‍ट्र सरकारने अजून या जुगारावर कायद्याने बंदी घातलेली नाही. या जुगारामागचे चित्र फार विदीर्ण आणि भीषण आहे. पुष्‍कळ वेतन घेऊन नोकरी करणारे अनेक नागरिक हे जुगाराच्‍या नादी लागून कर्जबाजारी झाले आहेत. अनेक लोक गुन्‍हेगारी मार्गाला लागले आहेत. कित्‍येक तरुण मुलांनी आत्‍महत्‍या केल्‍या आहेत. अशी किती कुटुंबे देशोधडीला लागली असतील ? याची गणती नाही. जुगाराचे व्‍यसन लागलेल्‍या व्‍यक्‍तीला योग्‍य वेळी समुपदेशन न केल्‍यास हे दुष्‍टचक्र चालूच रहाते. हे सर्व रोखण्‍यासाठी केंद्रीय अर्थ खात्‍याने ‘ऑनलाईन गेमिंग’, कॅसिनो अन् घोड्याच्‍या शर्यती यांसारख्‍या खेळांवर २८ टक्‍के ‘वस्‍तू आणि सेवा कर’ (जी.एस्.टी.) लागू करण्‍याचा निर्णय घेतला असला, तरी तो कितपत लाभदायक ठरणार ? याविषयी शंका आहे. हातातील स्‍मार्टफोनमुळे आपण ‘स्‍मार्ट’ (हुशार) झालो असलो, तरी हाच स्‍मार्टपणा असा धोकादायक ठरू शकतो, याकडे सर्वांनी गांभीर्याने पहाणे, हीच काळाची आवश्‍यकता आहे.

४. ‘ऑनलाईन’ जुगारवर बंदी करणारे तेलंगाणा हे पहिले राज्‍य !

देशात ऑनलाईन जुगारावर बंदी नाही; मात्र वर्ष २०१७ मध्‍ये कायद्याने ‘ऑनलाईन’ जुगारावर बंदी आणणारे तेलंगाणा हे पहिले राज्‍य ठरले आहे. आतापर्यंत केरळ, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्‍यांनी केवळ एका वर्षात ‘ऑनलाईन’ जुगारावर बंदी आणण्‍यासाठी कायदा आणून त्‍यात सुधारणा केल्‍या आहेत.

५.  जगभरात १० कोटींहून अधिक लोक ‘गॅम्‍बलिंग’मध्‍ये (जुगारामध्‍ये) हरतात !

‘ऑनलाईन’ जुगाराचे व्‍यसन लोकांना मानसिक आरोग्‍याशी संबंधित आणि नातेसंबंध यांविषयीच्‍या समस्‍यांकडे ओढून नेत आहे. या व्‍यक्‍ती पुढे दिवाळखोरी आणि गुन्‍हेगारी यांकडे वळतात. १७ ते २७ वर्षे या वयोगटातील जुगार खेळणार्‍यांची संख्‍या मोठी असून त्‍यानंतरच्‍या वयात ‘गॅम्‍बलिंग’ नाकारण्‍याकडे कल वाढत जात असल्‍याचे अभ्‍यासकांचे निरीक्षण आहे. व्‍यसनाची समस्‍या असलेले लोक पुढे दिवाळखोरीकडे जातात. तसेच मद्यसेवन आणि सिगारेटचे व्‍यसनही जुगाराशी संबंधित असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. ‘प्रतिवर्षी जगभरात १० कोटींहून अधिक लोक ‘गॅम्‍बलिंग’मध्‍ये हरतात’, असे जागतिक आरोग्‍य संघटनेने केलेल्‍या एका पहाणीत आढळले आहे.

– दीपक भिसे, जव्‍हार तालुका, जिल्‍हा पालघर.

(साभार : दैनिक ‘नवशक्‍ति’)

 संपादकीय भूमिका 

‘ऑनलाईन जुगार आणि खेळ’ यांचे दुष्‍परिणाम पहाता सरकारने त्‍यावर तात्‍काळ बंदी आणावी, हीच राष्‍ट्रप्रेमींची अपेक्षा !