सातारा, २ ऑक्टोबर (वार्ता.) –‘थकबाकी नसल्याविषयीचा दाखला’ देण्यासाठी सातारा नगर परिषदेकडून १०० रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. नियमित आणि वेळेत कर भरणार्या नागरिकांनाही नगर परिषदेच्या या नियमातून सूट मिळत नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कार्यालयीन कामकाजासाठी नागरिकांना ‘थकबाकी नसल्याविषयीचा दाखला’ नगर परिषदेकडून हवा असतो; मात्र नगर परिषदेमध्ये आल्यानंतर हा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. इतर आस्थापनांकडून थकबाकी नसल्यामुळे नि:शुल्क ‘थकबाकी नसल्याविषयीचा दाखला’ दिला जातो. (ज्या दाखल्याच्या मुद्रणाची किंमत १ रुपयाही नाही.) तसाच सातारा नगर परिषदेकडून नि:शुल्क दाखला दिला जावा, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.