पुणे – शहरात गेल्या ८ मासांत १४ सहस्र ७२ नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे; मात्र यातील एकालाही ‘रेबीज’ची (कुत्रा चावल्यानंतर होणारा आजार) लागण झालेली नाही. गेल्या ३ वर्षांमध्ये ‘रेबीज’चा एकही रुग्ण आढळून आला नसला, तरी ३ वर्षांमध्ये शहराच्या हद्दीबाहेरील रेबीज झालेल्या ५२ रुग्णांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत. कुत्रा चावल्यानंतर त्वरित उपचार न घेतल्यास रेबीज हा विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता असते. रेबीजचा विषाणू मज्जासंस्थेवर आक्रमण करतो. त्यामुळे कुत्रा चावल्यावर त्वरित उपचार घेण्याचा सल्ला ‘जागतिक रेबीज दिना’निमित्त वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रेबीजमुळे जगभरातील एकूण मृत्यूंपैकी ३६ टक्के मृत्यू भारतात होतात. यापैकी ९५ टक्के घटनांमध्ये कुत्रा चावल्याने रेबीजची लागण होते. कुत्र्यांचे लसीकरण केले, तर रेबीज रोखणे शक्य आहे. कुत्र्यांना प्रतिवर्षी रेबीजविरोधी लसीचा १ डोस दिला जातो.
पुणे महापालिकेच्या मुख्य पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले की, कुत्र्यांचे ‘रेबीज’विरोधी लसीकरण व्हावे, यासाठी मोहीम राबवत आहोत.
संपादकीय भूमिका :सहस्रो नागरिकांना कुत्र्यांचा दंश होऊनही त्यावर ठोस उपाययोजना न काढणारे असंवेदनशील प्रशासन ! |