सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी स्‍वतः वापरलेली कापडाची लहान वळकटी साधिकेला वापरण्‍यास दिल्‍यावर तिला आलेल्‍या अनुभूती !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मणक्‍याचा त्रास दूर होण्‍यासाठी स्‍वतः वापरलेली कापडाची लहान वळकटी मला वापरण्‍यासाठी दिली. त्‍यानंतर मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत. 

१. सद़्‍गुरु डॉ. गाडगीळ यांनी वापरलेली कापडाची लहान वळकटी हातांत घेतल्‍यावर पुष्‍कळ भावजागृती होणे

४.७.२०२३ या दिवशी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ मला म्‍हणाले, ‘‘मला मणक्‍याचा त्रास असल्‍याने मी आसंदीत बसतांना कापडाची लहान वळकटी कमरेच्‍या मागच्‍या बाजूला ठेवतो. तेथील भागात ती वळकटी घट्ट बसते. त्‍यामुळे माझा मणक्‍याचा त्रास न्‍यून झाला आहे.’’ त्‍यांनी ती वळकटी मला आणून दिली. ती वळकटी हातांत घेतल्‍यावर माझी पुष्‍कळ भावजागृती झाली आणि कृतज्ञतेने माझे डोळे भरून आले.

श्रीमती मनीषा गाडगीळ

२. ‘सद़्‍गुरु गाडगीळ यांनी वापरलेली वळकटी म्‍हणजे चैतन्‍याचा मोठा स्रोतच आहे’, असे वाटणे आणि त्‍या वळकटीत असलेल्‍या चैतन्‍यामुळे कंबरदुखीचा त्रासही न्‍यून होणे

मी ती वळकटी लगेचच वापरण्‍यास आरंभ केल्‍यापासून माझ्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण दूर झाल्‍याचे मला जाणवते. ‘ती वळकटी सतत कमरेच्‍या मागे असल्‍यामुळे त्‍यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्‍यामुळे सेवा करतांना अधिक आनंद मिळत आहे’, असे मला जाणवते. ती वळकटी कमरेच्‍या भागात ठेवतांना मला सद़्‍गुरु गाडगीळकाकांची पुष्‍कळ आठवण येऊन माझी भावजागृती होते. ‘देवा, माझ्‍यासाठी किती रे करतोस ! मी तर तुझ्‍यासाठी काहीच करत नाही’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव जागृत होतो. ‘सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी वापरलेली ती वळकटी, म्‍हणजे माझ्‍यासाठी चैतन्‍याचा मोठा स्रोतच आहे’, असे मला वाटते. त्‍या वळकटीतील चैतन्‍यामुळे मला होत असलेला कंबरदुखीचा त्रास आता न्‍यून झाला आहे. बर्‍याच वेळा मी कमरेचा पट्टा लावून संगणकीय सेवा करत असे; परंतु आता त्रास न्‍यून झाल्‍याने मला सेवा करतांना कमरेचा पट्टा वापरावा लागत नाही.

३. वळकटी ठेवत असलेल्‍या आसंदीवर ३ – ४ दिवस दैवी कण दिसणे आणि ते दैवी कण पाहून कृतज्ञताभाव जागृत होणे 

एक दिवस मी रात्री १० वाजता सेवा करून आसंदीवरून उठले. तेव्‍हा माझे लक्ष त्‍या आसंदीकडे गेले. त्‍या ठिकाणी मला पुष्‍कळ दैवी कण दिसले. त्‍यानंतर सलग ३ – ४ दिवस काही दैवी कण आसंदी आणि सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी दिलेली वळकटी यांवर दिसत होते. ते दैवी कण पाहून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर, ‘आपल्‍याच कृपेने सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी वापरलेली वळकटी मला मिळाली आहे. तिच्‍यातील चैतन्‍याचा मला लाभ करून घेता येऊ दे’, अशी मी आपल्‍या आणि सद़्‍गुरु गाडगीळ यांच्‍या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक