सध्या चालू असलेल्या ‘पितृपक्षा’च्या निमित्ताने…
श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळतो. श्राद्ध म्हणजे काय ? आणि त्याविषयीचा इतिहास, तसेच श्राद्धविधी करण्यामागील उद्देश या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
१. व्युत्पत्ती आणि अर्थ
‘श्रद्धा’ या शब्दापासून ‘श्राद्ध’ हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते, ते ‘श्राद्ध’ होय.
२. व्याख्या
‘ब्रह्मपुराणा’च्या ‘श्राद्ध’ या प्रकरणात श्राद्धाची पुढील व्याख्या दिली आहे.
देश काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् ।
पितनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृतम् ॥
अर्थ : देश, काल आणि पात्र (योग्य स्थळ) यांना अनुलक्षून श्रद्धा अन् विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे (अन्नादी) दिले जाते, त्याला श्राद्ध म्हणावे.
३. समानार्थी शब्द
श्राद्धात्व पिंड, पितृपूजा, पितृयज्ञ
४. ‘श्राद्ध’ म्हणजे ‘पितरांचे कृतज्ञतेने स्मरण करणे’, एवढेच नाही, तर तो एक विधी आहे.’
५. श्राद्धविधीचा इतिहास
अ. ‘श्राद्धविधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रिऋषी यांची आहे. अत्रिऋषींनी त्यांच्या वंशातील निमीला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगितला. तो रूढ आचार आजही चालू आहे.
आ. मनूने प्रथम श्राद्धक्रिया केली; म्हणून मनूला ‘श्राद्धदेव’ म्हणतात.
इ. प्रभु श्रीराम लक्ष्मण आणि जानकी यांसह वनवासासाठी गेल्यानंतर भरत त्यांची वनवासात भेट घेतो अन् त्यांना पित्याच्या निधनाची वार्ता सांगतो. त्यानंतर ‘राम यथाकाली वडिलांचे श्राद्ध करतो’, असा उल्लेख रामायणात आहे.
६. इतिहासक्रमाने रूढ झालेल्या श्राद्धाच्या ३ अवस्था आणि सांप्रत काळातील अवस्था
अ. अग्नौकरण : ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन पितृपूजा केली जात असे.
आ. पिंडदान (पिंडपूजा) : यजुर्वेद, ब्राह्मणे आणि श्रौत अन् गृह्य सूत्रे यांत पिंडदानाचे विधान आहे. गृह्यसूत्रांच्या काळात पिंडदान प्रचारात आले. ‘पिंडपूजेला कधी आरंभ झाला ?’, यासंबंधीची पुढील माहिती महाभारतात (शांतीपर्व, १२.३.३४५) आहे. श्रीविष्णूचा अवतार वराहदेव याने श्राद्धाची संपूर्ण कल्पना विश्वाला दिली. त्याने आपल्या दाढेतून तीन पिंड काढून ते दक्षिण दिशेला दर्भावर ठेवले. ‘त्या तीन पिंडांना वडील, आजोबा आणि पणजोबा यांचे स्वरूप समजले जावे’, असे सांगून त्या पिंडांची तिळांनी शास्त्रोक्त पूजा करून वराहदेव अंतर्धान पावला. अशा रितीने वराहदेवाच्या सांगण्याप्रमाणे पितरांच्या पिंडपूजेला आरंभ झाला.’
इ. ब्राह्मणभोजन : गृह्यसूत्रे, श्रृति-स्मृति यांच्या पुढील काळात श्राद्धात ब्राह्मणभोजन आवश्यक मानले गेले आणि तो श्राद्धविधीतला एक प्रमुख भाग ठरला.
ई. वरील तीनही अवस्था एकत्रित : सांप्रत काळातील ‘पार्वण’श्राद्धात वरील तीनही अवस्था एकत्रित झाल्या आहेत. धर्मशास्त्रात हे श्राद्ध गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.
७. श्राद्ध करण्याचे उद्देश
अ. पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे.
आ. आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद़्गती प्राप्त झाली नसेल, म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे.
इ. काही पितर त्यांच्या कुकर्मांमुळे पितृलोकात न जातात्यांना भूतयोनी लाभते. अशा पितरांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्त करणे.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्ध’)