‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आपला हात धरून आपल्याकडून साधना करून घेतात’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

१. हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात येणे आणि सेवा करणे

‘माझा संगणक प्रशिक्षण संस्था चालवण्याचा व्यवसाय आहे. वर्ष २०१२ ते २०१८ पर्यंत मी दिवसा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असे आणि रात्री १० वाजेपर्यंत ‘ऑनलाईन’ कामे करत असे. फेब्रुवारी २०१८ मध्ये मी हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आलो आणि माझ्या सेवेला आरंभ झाला. त्यानंतर माझे व्यवहाराकडे लक्ष थोडे न्यून झाले. माझी मिळकत पूर्वीपेक्षा अल्प झाली. त्याच वेळी ‘इंटरनेट सेंटर्स’ची संख्याही वाढल्याने माझ्या उत्पन्नावर परिणाम झाला असावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. कोरोना महामारीमुळे व्यवसाय न्यून होणे आणि सेवेला अधिक वेळ मिळाल्याने आनंद होणे

वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारी चालू झाली. त्या कालावधीत मी संगणक प्रशिक्षण संस्थेत जात नसे. तेव्हा ‘साधनेला अधिक वेळ मिळाला’, याचा मला आनंद होत होता. नंतर ९ – १० मासांनी कोरोनाचे प्रमाण न्यून झाल्याने मी संगणक संस्था पुन्हा चालू केली. संगणक प्रशिक्षण संस्था असलेल्या खोलीचे भाडे न भरल्याने इमारतीचे मालक मला ओरडू लागले. ते मला म्हणाले, ‘‘कोरोना महामारीच्या काळात तुम्ही पैसे मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत आणि आता भाडे भरण्यासाठी पैसे नाहीत’, असे सांगत आहात.’’ तेव्हा मी त्यांना विनम्रपणे सांगितले,  ‘‘आता वर्ग (क्लास) पुन्हा चालू केला आहे. प्रत्येक मासाला अधिक पैसे देऊन तुमचे भाडे फेडून टाकीन.’’ त्यानंतर मी ४ – ५ मासांचे भाडे भरले.

३. मनात काळजीचे विचार आल्यास ‘गुरुदेव पाठीशी आहेत’, याची जाणीव होऊन सेवेकडे लक्ष देणे

कधी कधी माझ्या मनात ‘आर्थिक अडचण आल्यास काय करायचे ?’, असा विचार येऊन संघर्ष होतो. त्या वेळी ‘माझ्या पाठीशी अनंतकोटी ब्रह्मांडनायक गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) आहेत. संपूर्ण जगताचे पालन करणार्‍यांना माझ्या उदरनिर्वाहाचा काय भार वाटणार ?’, असा विचार करून मी सेवेकडे लक्ष देत होतो.

४. साधकाने व्यष्टी आणि समष्टी साधना याकडे अधिक लक्ष दिल्यामुळे त्याच्या पत्नीला राग येणे

जेव्हा माझी ‘व्यष्टी’ आणि ‘समष्टी’ साधना व्यवस्थित होत असे, तेव्हा माझ्या पत्नीला त्रास होत असे. मी नामजपादी उपाय आणि समष्टी सेवा करत असतांना माझे तिच्याशी बोलणे अल्प होत असे. त्या वेळी लगेच ती काहीतरी कारण काढून माझ्याशी भांडत असे. मी अंतर्मुख झाल्यास तिला राग येत असे.

५. साधकाने गुरुदेवांना मनोमन प्रार्थना करणे आणि त्याने व्यष्टी अन् समष्टी साधना अधिक वेळ करूनही त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया व्यक्त न करणे

एकदा ती माझ्याशी भांडत असतांना मी मनातच गुरुदेवांना प्रार्थना करू लागलो, ‘हे गुरुदेव, आता तुम्हीच मला या प्रसंगातून बाहेर पडण्याची शक्ती द्या. माझ्या साधनेत कोणतीच अडचण येऊ नये. मला तुमच्या चरणांशी लवकरात लवकर स्थान मिळू दे.’

त्यानंतर गेल्या २ मासांपासून मी व्यष्टी साधनेत कितीही व्यस्त झालो आणि समष्टी साधनेला अधिक वेळ दिला, तरीही पत्नी प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. हे केवळ गुरुकृपेने साध्य झाले आहे.

‘गुरुदेव आपला हात कधीच सोडत नाहीत. आपल्याकडून साधना करून घेतात’, याची मला निश्‍चिती झाली आहे. गुरुदेवा, मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– एक साधक (१८.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक