संकेतस्थळावरील नादुरुस्त ‘तक्रार निवारण प्रणाली’ हटवून त्याजागी तक्रारीसाठी ‘आपले सरकार’ची लिंक उपलब्ध !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या  वृत्तानंतर ‘आर्.टी.ओ.’ची कार्यवाही !

मुंबई – दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे  प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील नादुरुस्त ‘तक्रार निवारण प्रणाली’ हटवून त्याजागी आता प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ‘आपले सरकार’ या अ‍ॅपची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१. प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील ‘तक्रार निवारण प्रणाली’ नादुरुस्त असल्याचे वृत्त प्रथम दैनिक ‘सनातन प्रभात’ने १४ सप्टेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध केले.

२. गृहविभागाने ८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी परिवहन विभागाकरता ‘तक्रार निवारण प्रणाली’ आणि ‘मोबाईल अ‍ॅप’ यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम ‘महाआयटी’ या आस्थापनाला देण्याचा, तसेच त्यासाठी३७ लाख रुपयांहून अधिक निधीला मान्यता देण्याचा शासन आदेश काढला होता.

३. ७ मासांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता ‘महाआयटी’ने त्यांच्याकडे हे काम आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १४ सप्टेंबर २०२३ च्या अंकामध्ये पृष्ठ क्र. १ वर  ‘परिवहन विभागाच्या तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीचा शासनाचा आदेश कागदावरच’ हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध करून हा संपूर्ण प्रकार उघड केला होता.

४.   दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने राज्याचे परिवहन उपायुक्त संदेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित शासन आदेश रहित करण्यात आल्याचे सांगून परिवहन विभागाविषयीच्या तक्रारी महाराष्ट्र शासनाचे ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येणार असल्याचे सांगितले.

५. त्या वेळी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने राज्य परिवहन मंडळाच्या संकेतस्थळावर तक्रारीसाठी काही सोय किंवा कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने ‘प्रवाशांना तक्रार कुठे करायची ?’, हे त्यांच्या लक्षात येऊ शकत नाही, हे लक्षात आणून दिले.

६. त्यानंतर त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या ‘https://transport.maharashtra.gov.in/’ या संकेतस्थळावर राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ या अ‍ॅपच्या तक्रार करण्याच्या सुविधेची ‘लिंक’ उपलब्ध करून दिली. यासह राज्य परिवहन मंडळाची पूर्वीची नादुरुस्त तक्रार निवारण प्रणाली काढण्यात आली आहे.

अवाच्या सवा तिकीटदर आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांच्या विरोधात ‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवता येणार !

ऐन गणेशोत्सवामध्ये खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांकडून अवाच्या सवा तिकीटदर आकारले जात आहेत. याविषयी आता प्रवाशांना प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या तक्रार निवारण प्रणालीवर ‘ऑनलाईन’ तक्रार करता येणार आहे.

संबंधित विविध ‘मोबाईल अ‍ॅप्स’सुद्धा संकेतस्थळावर ठेवले !

परिवहन मंडळाचे विविध ‘मोबाईल अ‍ॅप्स’सुद्धा अनेक मासांपासून बंद होते. याकडेही दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्तामध्ये लक्ष वेधण्यात आले होते. यांनतर यामध्ये दुरुस्ती करण्यात आली असून परिवहन विभागाशी संबंधित विविध ‘अ‍ॅप्स’ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.