जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली असून ते हवेत गोळीबार करत आहेत ! – मायकेल रुबिन, अमेरिकेचे माजी अधिकारी

अमेरिकेच्या माजी उच्चाधिकार्‍याने सुनावले !

वॉशिंग्टन (अमेरिका) – मला वाटते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी अशा पद्धतीने भारतावर आरोप केले आहेत, ज्याचे पुरावे त्यांना अद्याप सादर करता आलेले नाहीत. यामागे २ शक्यता असू शकतात. एक तर ते हवेत गोळीबार करत आहेत आणि त्यांच्याकडे भारत सरकारच्या विरोधात ते करत असलेल्या आरोपांना पाठबळ देणारे कोणतेही पुरावे नाहीत. किंवा दुसरी शक्यता म्हणजे या प्रकरणात खरेच तथ्य असू शकेल; पण कोणत्याही शक्यतेमध्ये जस्टिन ट्रुडो यांना हे सांगावेच लागेल की, त्यांनी रक्तपात केलेल्या एका आतंकवाद्याला कॅनडामध्ये आश्रय का दिला होता ?, अशा शब्दांत अमेरिकेचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी कॅनडाला सुनावले आहे. ते ए.एन्.आय. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. रुबिन अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आणि अमेरिकेच्या सरकारमधील माजी उच्चपदस्थ अधिकारी आहेत.

कॅनडाचे शत्रूत्व म्हणजे मुंगी विरुद्ध हत्ती यांसारखे !

मायकेल रुबिन पुढे म्हणाले की, या सगळ्या वादामध्ये मोठा धोका भारतापेक्षा कॅनडालाच अधिक आहे. जर कॅनडाने भारताशी वाद ओढवून घेतलाच, तर या घडीला हे एखाद्या मुंगीने हत्तीशी वैर करण्यासारखे होईल; कारण सत्य हे आहे की, भारत ही जगातली सर्वांत मोठी लोकशाही आहे. जागतिक स्तरावर भारत धोरणात्मकदृष्ट्या कॅनडापेक्षा खूप अधिक महत्त्वाचा आहे. विशेषत: चीनचे आव्हान आणि दक्षिण आशियातील इतर समस्यांचा विचार करता भारत महत्त्वाचा आहे.

ट्रुडो यांच्यावर कुणीही विश्‍वात ठेवत नाही !

कॅनडामध्ये लवकरच निवडणुका होणार असून त्यासाठी ट्रुडो यांनी हे आरोप केले असण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यावर रुबिन म्हणाले की, ट्रुडो यांना अद्याप कोणतेही पुरावे सादर करता आलेले नाहीत. त्यामुळे जेव्हा ते म्हणतात ‘माझ्यावर विश्‍वास ठेवा’, तेव्हा त्यांच्यावर कुणीही विश्‍वास ठेवत नाही. हे सर्व निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर घडत आहे. त्यामुळे आता तरी ट्रुडो पराभूत होत असल्याचे दिसत आहे.