कॅनडामध्ये भारतियांमुळे अर्थव्यवस्थेला मिळतात ३ लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे !

टोरंटो (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात वाद निर्माण झाला आहे. भारताने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचे सध्या थांबवले आहे. या निर्णयामुळे कॅनडातील अर्थतज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे; कारण कॅनडातील २० लाख भारतीय कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत प्रतिवर्षी ३ लाख कोटी रुपयांहून अधिकचे योगदान देतात. प्रतिवर्षी ७५ सहस्र कोटी रुपये एकट्या भारतातून जाणार्‍या जवळपास २ लाख विद्यार्थ्यांच्या शुल्कातून कॅनडाला मिळतात.

कॅनडाला त्याचा ‘टोरंटो-वॉटर्लू आयटी कॉरिडॉर’ प्रकल्प अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीच्या धरतीवर विकसित करायचा आहे. यासाठी तो भारतियांवर अबलंबून आहे. कॅनडाने यासाठी चीनच्या व्यावसायिकांऐवजी भारतियांना प्राधान्य दिले आहे. कॅनडामध्ये सर्वाधिक भारतीय नागरिक मालमत्तेत गुंतवणूक करतात. चीन दुसर्‍या स्थानी आहे. भारतीय अनुमाने प्रतिवर्षी ५० सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करतात. भारतियांनी किराणा दुकान, उपहारगृहे आदी लघु व्यवसायात ७० सहस्र कोटी रुपये गुंतवले आहेत. भारतीय वंशाचे नागरिक कॅनडात करत असलेल्या पर्यटनामुळे जवळपास ६० सहस्र कोटी रुपये येथील विविध ट्रॅव्हल एजन्सींना मिळतात. विविध भारतीय आस्थापनांनी कॅनडामध्ये मे २०२३ पर्यंत ४१ सहस्र कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत १७ सहस्र नोकर्‍या दिल्या आहेत.

हिंदूंना धमकी देणार्‍यांवर कॅनडा कारवाई करणार !

हिंदूंना कॅनडा सोडून जाण्याची धमकी दिल्यावरून कॅनडाचे नागरी सुरक्षा मंत्रालय म्हणाले की, हिंदूंच्या विरोधात द्वेष पसरवणारी आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये करणार्‍यांवर सरकारकडून कडक कारवाई केली जाईल. (केवळ असे सांगू नये, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवावी ! – संपादक)

कॅनडामध्ये ख्रिस्ती कुकी संघटनेचे खलिस्तान्यांना समर्थन  !

मणीपूर येथील ख्रिस्ती धर्मीय कुकी समाजाच्या संघटनेने कॅनडात खलिस्तान समर्थकांशी हातमिळवणी केली आहे. कुकी फुटीरतावादी संघटना ‘नॉर्थ अमेरिकन मणीपूर ट्रायबल असोसिएशन’चे अध्यक्ष लियेन्लल्थांग गंग्ते यांनी कॅनडाच्या सरे शहरामध्ये खलिस्तान समर्थकांच्या एका सभेत भाग घेतला.