इराणमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घातल्यास १० वर्षांचा कारावास

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

तेहरान (इराण) – इराणच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यास नकार देणार्‍या आणि त्यांना पाठिंबा दर्शवणार्‍या महिलांना शिक्षेची तरतूद असलेले विधेयक संमत केले. हिजाब परिधान करण्यास नकार देणारी महिला, तिला महत्त्व देणार्‍या आणि अशा महिलांना सेवा देणार्‍या आस्थापनांच्या मालकांना शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा गुन्हा एखाद्या समूहाकडून झाला, तर कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणे कायद्यानुसार अनिवार्य आहे. याचा गेल्या एक वर्षांपासून इराणी महिलांकडून विरोध केला जात आहे. याविरोधातील आंदोलनात अनेकांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोकांना अटक करून कारागृहात डांबण्यात आले आहे.