अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली गुन्हेगारीचे उदात्तीकरण चालू असल्याचेही केले वक्तव्य !
ओटावा (कॅनडा) – भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेल्या संबंधांमध्येच आता कॅनडाच्या संसदेतील हिंदु खासदार चंद्रा आर्या यांनी अत्यंत गंभीर वक्तव्य केले आहे. आर्या यांनी कॅनडातील हिंदूंना आवाहन करणारा व्हिडिओ ‘एक्स’द्वारे प्रसारित केला आहे. यात ते म्हणतात की, काही दिवसांपूर्वी कॅनडातील खलिस्तानी चळवळीचा नेता आणि ‘सिख फॉर जस्टिस’चा अध्यक्ष गुरपतवंत सिंह पन्नू याने कॅनडातील हिंदूंवर शाब्दिक आक्रमण करत आम्हा हिंदूंना कॅनडातून भारतात निघून जायला सांगितले. यानंतर अनेक हिंदू कॅनेडियन नागरिक आतंकवादाच्या सावटाखाली असल्याचे मी ऐकले आहे. माझे कॅनडातील हिंदु नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी शांत पण सतर्क रहावे. अशा प्रकारच्या हिंदुद्वेषाचा कोणताही प्रकार तुम्हाला दिसल्यास तातडीने स्थानिक सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती द्या. खलिस्तानी चळवळीचे नेते येथील हिंदु नागरिकांना भडकावून देशात हिंदू आणि शीख यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
सौजन्य एकॉनॉमिक टाइम्स
आर्या यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !
१. मी स्पष्टच सांगतो की, कॅनडातील बहुतांश शीख समुदायाचा खलिस्तानी चळवळीला पाठिंबा नाही. अनेक शीख नागरिक काही कारणास्तव जाहीरपणे खलिस्तानी चळवळीचा निषेध करू शकत नाहीत; पण त्यांचे कॅनडातील हिंदु नागरिकांशी चांगले संबंध आहेत. हे संबंध कौटुंबिकही आहेत, सामाजिक-सांस्कृतिकही आहेत.
२. मला हे कळत नाही की, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आतंकवाद किंवा द्वेषमूलक गुन्ह्यांचे उदात्तीकरण कसे केले जाऊ शकते ? जर कॅनडातील हिंदु समुदाय या भडकावण्याला बळी पडला, तर कॅनडामध्ये गंभीर परिस्थिती ओढवेल; पण खलिस्तानी नेते हिंदूंना भडकावणे सोडणार नाहीत, असेच दिसते. कॅनडातील हिंदु नागरिक शांत रहातात आणि त्यांनाच सहज लक्ष्य करता येईल, अशी खलिस्तान्यांची धारणा आहे.
३. हिंदु नागरिकांनी मिळवलेले यश हिंदुविरोधी समाजघटकांना सहन होत नाही. असे दोन गट सुनियोजितपणे कॅनडातील हिंदूंवर आक्रमणे करत आहेत. माझ्यावरही आक्रमणे झाली आहेत. कॅनडाच्या ध्वजासह आपले ॐ चिन्ह झळकवल्यामुले गेल्या १० मासांपासून मला सातत्याने लक्ष्य केले जात आहे.
४. माझी सर्व हिंदु कॅनेडियन नागरिकांना पुन्हा विनंती आहे की, त्यांनी शांत परंतु सतर्क रहावे. एक कॅनेडियन नागरिक म्हणून आपल्या हिंदु श्रद्धा, वारसा आणि कॅनडाच्या विकासातील आपले योगदान याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. (केवळ हिंदु समाजच जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तेथील राष्ट्र आणि संस्कृती यांच्याशी एकरूप होतो. तेथील मातीला स्वत:ची माती समजून तेथील विकासासाठी नि:स्वार्थ रूपाने कार्यरत होतो. हा हिंदूंना मिळालेल्या व्यापक धर्माच्या शिकवणीचाच परिणाम आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे जस्टिन ट्रुडो यांनी ‘तेथील हिंदु नागरिकांच्या संरक्षणासाठी ते काय करणार आहेत ?’, हे त्यांना सांगण्यासाठी भाग पाडले पाहिजे ! |